अंतराळातील शेकडो टन कचरा पृथ्वीचा विनाश घडवू शकतो

पृथ्वीवर अनेक टन कचरा आहेच, पण अवकाशातील कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. आत्तापर्यंत सुमारे साडेसहा हजार रॉकेट्सचे यशस्वी उड्डाण झाले आहे. या रॉकेट्सचा कचरा पृथ्वीच्या बाह्य कक्षेत जमा होत असल्याचे सांगितले जात आहे. युरोपिअन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्यामते 2030 पर्यंत उपग्रह वाढतील आणि 75 हजारांपुढे जातील. प्रत्येक प्रक्षेपणाने अवकाशातील कचरा वाढतच जाणार आहे.

Combined Force Space Component Command (CFSCC) अंतराळात मानव काय करत आहे यावर लक्ष ठेवते. आता CFSCC ने एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये अंतराळातील विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. CFSCC च्या शास्त्रज्ञांनी एक पद्धत तयार केली आहे, ज्याद्वारे 3 किमी प्रति सेकंद वेगाने फिरणाऱ्या 10 सेमी आकाराच्या वस्तूंचा मागोवा घेतला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त देखील अतंराळात बराच कचरा असल्याचे सांगितले जाते. अंतराळातील कचरा कुठे आणि कोणत्या वेगाने जात आहे हे जाणून घेण्यासाठी लिडार(रडार आणि ऑप्टिकल डिटेक्टरपासून बनवेलेली मशीन) नावाच्या उपकरणाने अंतराळातील कचराचा मागोवा घेतला जात आहे.

सध्या, अंतराळात 10 सेमी किंवा त्याहून मोठ्या आकाराच्या 1 दशलक्ष वस्तू पृथ्वीभोवती फिरत आहेत. 1 ते 9 सेमी पर्यंतच्या 130 दशलक्ष पेक्षा अधिक वस्तू आहेत. या वस्तूंमध्ये अंतराळ यानांचा कचरा, रंग, आणि मलमूत्र असण्याची शक्यता आहे. या वस्तूंचा आकार जरी लहान असला तरी बंदुकीच्या गोळीपेक्षा ते वेगाने पुढे जात आहेत.

अंतराळ मोहिमेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक देशांनी यश अपयश पाहिले आहे. पाठविलेले यान अथवा उपग्रहांचे नुकसान झाले आहे. काहीवेळेस या यानांचा अपघात झाला तर काही वेळेस यान काम करणे बंद झाले. अनेक यान रॉकेट बूस्टरसह प्रवास करतात. त्यानंतर हे बूस्टर अवकाशात सोडले जातात. अँटी सॅटेलाईट (ASAT) शस्त्रे देखील कचरा पसरविण्यास कारणीभूत आहेत. असॅट ही अशी क्षेपणास्त्रे आहेत, जी पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रह नष्ट करण्यासाठी पाठवली जातात. उपग्रह नष्ट झाल्यानंतर त्याचा कचरा अवकाशात पसरतो.

अंतराळात सध्या, 10 सेमी किंवा त्याहून मोठ्या आकाराच्या 1 दशलक्ष वस्तू पृथ्वीभोवती फिरत आहेत. या वस्तूंचा वेग बंदुकीच्या गोळीपेक्षा अधिक असतो त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असताना तो उपग्रहाशी आदळल्यास गंभीर नुकसान होऊ शकते. यापूर्वी 2021 मध्ये, चिनी हवामान उपग्रहाचा कचरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आदळल्याने आयएसएसमध्ये छिद्र पडले होते.