
स्पेसएक्सचे आणखी चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोचले आहेत. यामध्ये हिंदुस्थानी वंशाचे राजा चारी यांचा समावेश आहे. खराब हवामान आणि अन्य कारणांमुळे स्पेसएक्सच्या मोहिमेत व्यत्यय आला होता. अखेर बुधवारी अंतराळवीरांना घेऊन रॉकेट रवाना झाले.
राजा चारी, टॉम मार्शबुर्न, कायला बॅरोन आणि मॅथियास मौरर अशी चौघांची नावे आहेत. 44 वर्षीय हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन नागरिक राजा चारी हे यूएस एअर फोर्स फायटर जेटचे प्रशिक्षित पायलट आहेत. त्यांना मिशन कमांडर बनवण्यात आले आहे.
चौघेही 22 तासांच्या उड्डाणानंतर युरोपियन वेळेनुसार गुरुवारी सायंकाळी 6.32 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोचले, अशी माहिती नासाने दिली. स्पेसएक्स क्रू 3 असे या मोहिमेचे नाव आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती सहा महिने अंतराळ स्थानकात राहून संशोधन करणार आहेत.
भविष्यातील चांद्र मोहिमा तसेच मंगळ मोहिमेसाठी हे पायाभूत संशोधन उपयोगी पडेल. दोन दिवसांपूर्वी स्पेसएक्स स्पेसक्राफ्टमधून नासाचे अंतराळवीर शेन किमब्रो आणि मेगन मॅकआर्थर, जपानचे अकिहितो होशिडे आणि फ्रान्सचे थॉमस पेस्केट हे पृथ्वीवर परतले. अंतराळ स्थानकात त्यांनी 200 दिवस वास्तव्य केले होते.
























































