
बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेतली आहे. अजित पवार प्रवास करत होते त्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ विमान कंपनीचे विशेष ऑडिट होणार आहे. ऑडिट करून अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे आदेश डीजीसीएने दिले आहेत.
अजित पवार ‘लिअरजेट 45 एक्सआर’ या जातीच्या विमानातून प्रवास करत होते. त्या विमानाला झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने विशेष पथक नेमले आहे. कंपनीचे दैनंदिन कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक्स आणि विमानांच्या देखभालीचे रेकॉर्डस् या पथकाकडून तपासले जाणार आहेत.
व्हीएसआर व्हेंचर्सची विमाने वादग्रस्त
व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीची विमाने यापूर्वीही वादग्रस्त ठरली होती. या कंपनीच्या व्हीटी-डीबीएल या विमानाचा सप्टेंबर 2023मध्ये मुंबईमध्ये अपघात झाला होता. त्या वेळी युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (यूयूएएस) कंपनीकडून काही माहिती मागितली होती. मात्र कंपनी समाधानकारक माहिती देऊ शकली नाही. त्यामुळे यूयूएएसने व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमानांना आपल्या हद्दीत प्रवेशबंदी केली होती.




























































