एक क्लिकवर दोन हजार भटजी येणार गणेशपूजेला, दुबईसह विविध देशांमध्येही  सेवासुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गणेश चतुर्थी आली की घरोघरी एकच धांदल उडते. साग्रसंगीत पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांपासून ते भटजींना बोलावण्यापर्यंत सर्व कामे करताना अक्षरशः नाकीनऊ येतात. परंतु आता ‘माय ओम् नमो’ हे ऍप दिमतीला आले आहे. या ऍपच्या एका क्लिकवर पूजेसाठी विविध भाषांमधले तब्बल दोन हजार भटजी उपलब्ध होणार आहेत.

परदेशातील कुटुंबीयांसाठीही ‘माय ओम् नमो’ हे ऍप अत्यंत उपयोगी ठरणार आहे. याशिवाय एका क्लिकवर आपला आवडता गणपतीही जगभरातील भाविकांना उपलब्ध होऊ शकणार आहे. सात्विक पूजा कीट तयार करण्यासाठी १८०० महिला बचत गटांनी मदत केली, अशी माहिती ‘माय ओम् नमो’ ऍपचे संस्थापक मकरंद पाटील यांनी दिली.

 कुठल्या सेवासुविधा…

‘माय ओम् नमो’ ऍपच्या माध्यमातून संपूर्ण गणेश पूजा कीटमध्ये २४ प्रकारच्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती, ३० प्रकारचे कागदाचे मखर, पूजा सामग्री कीट तसेच पूजेसाठी भटजीही उपलब्ध होतील. पूजा कीटमध्ये २७ प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार आहे.

  • दुबईतील २५० कुटुंबांनी गणेशपूजा कीटची ऑर्डर दिली आहे.
  • ही सेवा मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार, नाशिक, संभाजीनगर, पुणे, नागपूर इत्यादी भागांमध्ये उपलब्ध आहे.
  • ही सेवा http://www.myomnamo.com या संकेतस्थळावरही उपलब्ध.