
एरव्ही जगात स्त्री-पुरुष समानतेच्या बाता मोठय़ा ऐटीने मारल्या जातात.पण अनेक क्षेत्रात याबाबतीत असमानतेचे वातावरण आहे. पण न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मात्र आता पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून 5 जुलै रोजी अंतिम स्वरूप देण्यात आलेल्या करारांनुसार आता न्यूझीलंडच्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निर्णय बोर्डाशी संबंधित सर्व प्रकारच्या क्रिकेटपटूंना लागू होणार असल्यामुळे एकदिवसीय, टी-20, फोर्ड ट्रॉफी आणि सुपर स्मॅश लीगमध्ये खेळणाऱया महिला क्रिकेटपटूंनादेखील त्यांच्या श्रेणीतील पुरुष क्रिकेटपटूंएवढेच मानधन मिळणार आहे.

























































