बुमराह वादळात इंग्लंड सपाट, पहिल्या वनडेत टीम इंडियाचा 10 विकेटने विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज जसप्रीत बुमराह नावाचे तुफान घोंगावले. या वादळात यजमान इंग्लंडची फलंदाजी अक्षरशः पाल्यापाचोळय़ाप्रमाणे उडून गेली. हिंदुस्थानच्या तुफानी माऱ्यापुढे यजमान इंग्लंडचा डाव 25.2 षटकांत 110 धावांत गडगडला. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानने या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे टी-20 लढतीत रूपांतर करीत 18.4 षटकांत एकही फलंदाज न गमावता 114 धावा करीत विजयी सलामी दिली. हिंदुस्थानच्या या रुबाबदार विजयात अनेक विक्रमांचा पाऊस पडला हे विशेष. सामनावीराची माळ अर्थातच जसप्रीत बुमराहच्या गळय़ात पडली.

इंग्लंडकडून मिळालेले 111 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 10 गडी आणि 31.2 षटके राखून सहजपणे पूर्ण केले. यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद 76 धावांची खेळी केली. त्याच्या 58 चेंडूंतील नाबाद खेळीला 7 चौकार व 5 षटकारांचा साज होता. शिखर धवनने 54 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 31 धावांची खेळी केली. हिंदुस्थानने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

पहिल्या तीन फलंदाजांचा भोपळा

नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडला फलंदाजी देण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय हिंदुस्थानी गोलंदाजांनी सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहने दुसऱयाच षटकात भोपळाही न फोडणाऱ्या जेसर रॉयचा त्रिफळा उडवत हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याच्या जागेवर आलेल्या जो रूटलाही बुमराहने खाते उघडण्यापूर्वीच यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने बेन स्टोक्सला शुन्यावरच पंतकरवी झेलबाद करून इंग्लंडची 2.4 षटकांत 3 बाद 7 अशी दुर्दशा केली.

बटलर, विलीचा थोडाफार प्रतिकार

आघाडीच्या फळीला भगदाड पडल्याने एका बाजूने उभा असलेला जॉनी बेअरस्टॉही गडबडून केला. 20 चेंडूंमध्ये अडखळत 7 धावा करणाऱ्या या सलामीवीराला बुमराहने पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या जागेवर आलेला लियाम लिव्हिंगस्टोनचा बुमराहने एका भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवून इंग्लंडला पाचवा हादरा दिला. शून्यावर बाद होणारा इंग्लंडचा चौथा फलंदाज ठरला. कर्णधार जोस बटलर इंग्लंडकडून सर्वाधिक 30 धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 32 चेंडूंत 6 चौकार लगावले. मोईन अली 14 धावांवर बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद करीत हिंदुस्थानला सहावे यश मिळवून दिले. मग पुन्हा मोर्चावर आलेल्या मोहम्मद शमीने बटलरला झेलबाद करून इंग्लंडच्या मोठा धक्का दिला. त्यानंतर शमीने ओव्हरटनचा (8) त्रिफळा उडवला. मग डेव्हिड विली (21) व ब्रायडन कार्स (15) यांनी हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे थोडाफार तग धरला. जसप्रीत बुमराहने या दोघांची दांडी गुल करून इंग्लंडचा डाव संपवला.

दृष्टिक्षेपात…

– इंग्लंडची हिंदुस्थानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील 110 ही नीचांकी धावसंख्या ठरली.

– एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्व 10 विकेट वेगवान गोलंदाजांनी टिपण्याची हिंदुस्थानची ही दुसरी वेळ. याआधी 2014 साली बांगलादेशविरुद्ध वेगवान गोलंदाजांनी 10 फलंदाज बाद केले होते.

– 10 षटकांत इंग्लंडचे 5 फलंदाज बाद होण्याची ही दुसरी वेळ. याआधी 2004 साली दाम्बुलामध्ये यूएईविरुद्ध हिंदुस्थानने 10 षटकांत 5 फलंदाज बाद केले हेते.

बुमराहने मोडला नेहराचा विक्रम

जसप्रीत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेत इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने आशीष नेहराचा 19 वर्षांपूर्वीचा विक्रम आज मोडीत काढला. नेहराने 2003 सालच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध 23 धावांत 6 फलंदाज बाद केले होते. आजच्या लढतीत मोहम्मद शमीनेही अचूक गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्या, तर प्रसिध कृष्णाने 1 विकेट मिळाली.