स्टोक्सच्या निवृत्तीला मॅक्युल्यमचे समर्थन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्युल्यम यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या निर्णयाचे समर्थन केले. मॅक्युल्यम म्हणाले, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने बेन स्टोक्सला कसोटी क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यास मदत होणार आहे. स्टोक्स हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. आयसीसीच्या भरगच्च वेळापत्रकामुळे आपण क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्त होत असल्याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. चाहत्यांना बेन स्टोक्सला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळताना बघायला आवडते. तो क्रिकेटमधील एक सुपरस्टार खेळाडू आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला जगज्जेते बनविण्यात बेन स्टोक्सचे बहुमोल योगदान आहे. या 31 वर्षीय क्रिकेटरला त्याच्या शरीराने सांगितले म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, असे स्पष्टीकरण मॅक्युल्यमने दिले.