श्रीलंकेत अराजक! राष्ट्रपतींच्या घरासमोर आगडोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक संकट, अन्नधान्य, इंधनाची टंचाई, प्रचंड महागाईमुळे श्रीलंकेमध्ये अराजक माजले असून जनक्षोभाचा भडका उडाला आहे. गुरुवारी रात्री हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि थेट राष्ट्रपती गोटभाय राजपक्षे यांच्या निवासस्थानावर धडक दिली. जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक करीत जाळपोळ केली. राजधानी कोलंबोच्या काही भागात संचारबंदी लावण्यात आली असून देशभरात बंदोबस्त वाढविला आहे.

श्रीलंकेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भयानक आर्थिक संकट ओढवले आहे. अन्नधान्याची टंचाई आहे. पेट्रोल, डिझेल मिळत नाही. वीज 12-13 तास गायब आहे. वीजटंचाईमुळे हॉस्पिटल्समधील शस्त्र्ाक्रिया बंद आहेत. औषधांची कमतरता आहे. ब्लॅकआऊटमुळे देशातील जनजीवन ठप्प झाले असून जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे.

श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाची सत्ता आहे. राष्ट्रपती गोटभाय राजपक्षे यांचे मोठे भाऊ महिंद्रा राजपक्षे हे पंतप्रधान आहेत. लहान भाऊ तुलजी राजपक्षे अर्थमंत्री तर चलम राजपक्षे कृषीमंत्री आहेत. आर्थिक संकटामुळे जनतेचा रोष राजपक्षे भावांविरुद्ध आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी गुरुवारी रात्री हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.