
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक पाऊल उचलले आहे. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षण (AAA) तपासणीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ‘ई’ (किंवा अपात्र श्रेणी) मिळालेल्या तब्बल २९ महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदव्युत्तर प्रवेशांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून संबंधित महाविद्यालयांना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यापीठाने स्पष्ट इशारा दिला आहे की, बंदी घालण्यात आलेल्या महाविद्यालयांनी नियमांचे उल्लंघन करून प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची सर्व जबाबदारी संबंधित महाविद्यालय प्रशासनावर राहील. यात पात्रता रद्द होणे, परीक्षा अर्ज नाकारले जाणे, हॉल तिकीट न मिळणे किंवा निकाल रोखून धरणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.
ही कारवाई केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांपुरती मर्यादित असून फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र (बी.एड./एम.एड.) आणि शारीरिक शिक्षणशास्त्राशी संबंधित व्यावसायिक महाविद्यालयांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.
AAA मूल्यांकनासाठी एकूण ७२ महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी ५ महाविद्यालयांना ‘ओ’ श्रेणी, ११ महाविद्यालयांना ‘ए’ श्रेणी, १३ महाविद्यालयांना ‘बी’ श्रेणी, ४ महाविद्यालयांना ‘सी’ श्रेणी, ५ महाविद्यालयांना ‘डी’ श्रेणी मिळाली; तर तब्बल २९ महाविद्यालये अपात्र श्रेणीत आढळली.
या २९ महाविद्यालयांमध्ये नांदेड जिल्ह्यातील १८, लातूर जिल्ह्यातील ७ आणि परभणी जिल्ह्यातील ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्या परिषद व अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘ई’ ग्रेड श्रेणीत असणारी महाविद्यालये
‘ई’ ग्रेड श्रेणीत समाविष्ट झालेल्या महाविद्यालयांमध्ये नांदेड, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील एकूण २९ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये बसंतराव नाईक महाविद्यालय, श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, पनसरे महाविद्यालय, शरदचंद्र आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर, धुंडा महाराज देगलूरकर कॉलेज, कै. भीमराव चव्हाण आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, बळीराजा आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट, राजर्षी गोविंदराव महाविद्यालय, एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय, विश्वभारती महाविद्यालय, विवेकवर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालय, सिंधू कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गुरुगोविंदसिंग कॉलेज, संत संभाजी शिंदे कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, डीएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, यशवंत कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, श्री कृष्णार्पण महाविद्यालय, कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, सरस्वती संगीत कला महाविद्यालय, श्यामगिरी महाविद्यालय, मातृभूमी महाविद्यालय आणि विद्यारत्न महाविद्यालय यांचा समावेश आहे.































































