दहावीची परीक्षा रद्द!

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील बिकट होत चाललेली परिस्थिती लक्षात घेता राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दहावीच्या परीक्षेला बसणाऱया राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीएसईपाठोपाठ आयबी, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांनी याआधीच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य सरकार एसएससी बोर्डाच्या परीक्षेविषयी काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांचेही डोळे लागले होते. गेल्या आठवडय़ात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे होणार दहावीचे मूल्यमापन

दहावीनंतरच्या प्रवेशात सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये समानता असावी याकडे शिक्षण विभागाचा भर आहे. त्यानुसार इतर केंद्रीय बोर्डांपाठोपाठ राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षण मंडळातील तज्ञांशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्याबाबत विचार करू तसेच विद्यार्थी त्यांच्या निकालाबाबत असमाधानी असल्यास अशा विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबतही तज्ञांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारावीची परीक्षा होणार

दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ही परीक्षा मेअखेरपर्यंत घेण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभाग करीत असून त्या वेळची कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. बारावीनंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखा निवडतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रक लक्षात घेता बारावीच्या परीक्षा त्या वेळेनुसार घेण्यावर भर असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या