दहावी, बारावीच्या परीक्षांमधून श्रेणी विषय अखेर हद्दपार, प्रत्येक विषयाचे मूल्यमापन गुणांकन पद्धतीने

दहावी, बारावीच्या परीक्षेतील श्रेणी (ग्रेड) विषय आता हद्दपार करण्यात आले आहेत. परीक्षेतील सर्वच विषयांचे गुणांकन पद्धतीने मूल्यमापन करण्याची शिफारस राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले असल्याने आता नियमित विषयांबरोबच या विषयांचीही प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.

श्रेणी विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गौण मानले जातात. त्यामुळे या विषयांचे मूल्यांकन श्रेणी पद्धतीने न करता गुणदान पद्धतीने करण्यात यावे, असे मसुद्यात म्हटले आहे. हा प्रास्तावित मसुदा असून नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचा विचार करून मसुदा अंतिम करण्यात येणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा जाहीर केला असून यात दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठे बदल सुचविले आहेत. आतापर्यंत कला शिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयांचे होणारे मूल्यमापन श्रेणी पद्धतीने होत होते. पण आता व्यवसाय शिक्षण, कला शिक्षण, शारीरिक शिक्षणासाठी 75 टक्के मूल्यमापन हे प्रात्यक्षिक परीक्षांवर, तर 25 टक्के मूल्यमापन लेखी परीक्षेवर आधारित असणार आहे. या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च गुणवत्तेच्या प्रणालीची आखणी व अंमलबजावणी करावी, तसेच ही प्रणाली शालेय व्यवस्थापनापासून स्वतंत्र असावी, अशी सूचना मसुद्यात केली आहे. याचाच अर्थ या विषयांचे होणारे शाळास्तरावर मूल्यमापनही आता शिक्षण मंडळ स्तरावर होणार आहे. त्याचबरोबर विज्ञान व इतर विषयांच्या एकूण मूल्यमापनाच्या 20 ते 25 टक्के महत्त्व प्रात्यक्षिक परीक्षेला असणार आहे.

दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात कोणत्याही विषयांचे मूल्यमापन श्रेणी पद्धतीने न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. श्रेणी विषयांना विद्यार्थी परीक्षेत फारसे महत्त्व देत नाहीत. त्यामुळे प्रत्येक विषयाचे मूल्यांकन गुण पद्धतीने होणे अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ात नियमित विषयांपेक्षा कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण यांना महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे या विषयांचे मूल्यमापन प्रात्यक्षिकांवर आधारित असेल. एमएससीईआरटीची मूल्यमापन समिती या विषयांच्या मूल्यमापन पद्धतीवर निर्णय जाहीर करेल. त्यासाठी मसुद्यावर आलेल्या हरकती, सूचनांचादेखील विचार होईल.
– महेंद्र गणपुले, शिक्षण अभ्यासक.

नापासांना पुन्हा त्याच वर्गात ठेवण्याचा निर्णय पालकांचा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात रोखू नये. मात्र आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक क्षमता व पात्रता असणे आवश्यक असल्याचे मसुद्यात म्हटले आहे. तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बाह्य यंत्रणेद्वारे करणे, तसेच नापास विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात एक वर्ष अधिक ठेवण्याचा निर्णय पूर्णपणे पालकांचा असेल, असे या मसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
बोर्डाच्या परीक्षांमध्ये सुचविलेले बदल

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे.
परीक्षांचे ओझे कमी होण्यासाठी अभ्यासक्रम कमी करणे.
वर्षातून दोनदा एकच परीक्षा घेणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना दुसऱयांदा परीक्षा देण्याची संधी मिळेल.
पाठ केलेली गोष्ट सांगण्यापेक्षा क्षमतांवर लक्ष ठेवणे.
परीक्षांमध्ये संगणक प्रणालीचा वापर करता येईल.
अभ्यास झालेल्या विषयांची विद्यार्थी त्यांना वाटेल तेव्हा परीक्षा देऊ शकतात.
मागणीनुसार परीक्षा प्रणालीकडे बोर्डाने वाटचाल करणे अपेक्षित.

असे असतील विषय
नववी, दहावी
तीन भाषा (2 हिंदुस्थानी, 1 विदेशी), गणित व संगणकीय विचार, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण.

अकरावी, बारावी
विविध शाखांमधील अभ्यासक्रम निवडता येणार. 2 भाषा (या स्तरावर साहित्य विषयही).
गट 2, 3, 4 मधून कमीत कमी 2 गटांतील विषय निवडणे आवश्यक.