
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दोन महिन्यांतील शैक्षणिक सहलींनी हात दिला आहे. 1 नोव्हेंबरपासून आतापर्यंत महामंडळाला शैक्षणिक सहलीतून 3 कोटी 10 लाख 63 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. या काळात एसटी महामंडळाच्या 11 आगारांतून 1 हजार 471 बसेस सहलीसाठी धावल्या असून, त्यांनी 8 लाख 99 हजार 480 किलोमीटरचे अंतर कापले आहे.
कोरोनानंतर दोन वर्षे आणि त्यानंतरच्या एसटी कर्मचाऱयांचा प्रदीर्घ संप मिटल्यानंतर यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचे वेध लागले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, यात पालकांचे संमतीपत्र, शिक्षण विभागाची परवानगी या अटी पूर्ण करूनच विद्यार्थ्यांना सहलीस नेण्यास सांगण्यात आले आहे.
कोरोना काळात दोन वर्षे शाळा बंद होत्या. यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू झाले. शाळांच्या दुसऱया सत्राला प्रारंभ झाला असून, दरवर्षी डिसेंबर-जानेवारी याकाळात शाळांच्या शैक्षणिक सहलीचा हंगाम असतो. परिवहन विभागदेखील शैक्षणिक सहलीसाठी सज्ज आहे. शाळांना सवलतीत सहलीसाठी बस देण्याचे ठरले आहे. मात्र, सहलीसाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पहिल्यांदाच सहलीला जाणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दुसरीकडे एसटीलाही चांगले उत्पन्न मिळत आहे. शालेय सहलीसाठी कोणत्याही स्थितीत खासगी बस न वापरता राज्य मार्ग परिवहन महामंडळाचीच बस वापरावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. कारण, यापूर्वी सहलीसाठी काही शाळा खासगी बसही वापरत होत्या. तसेच शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के सवलत दिली जाते. प्रतिकिलोमीटर 55 रुपयांचा दर असतो, पण शाळांना त्यातील केवळ 50 टक्के (प्रतिकिलोमीटर 28 रुपये) भरावे लागतात. दिवसभरात 300 किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. सहलींसाठी खासगी बसेसऐवजी एसटी महामंडळाच्या बसचा वापर करावा, प्रवासातील मुलांचे संरक्षण, आरोग्याची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापकांवर, तर मुलींचा सहभाग असेल, तर सोबत महिला शिक्षिका असणे गरजेचे असल्याच्या सूचना आहेत.
आगार बसेस केलेला प्रवास मिळालेले उत्पन्न
(किलोमीटरमध्ये) (रुपयांमध्ये)
तारकपूर 194 1,04,295 43,68,920
शेवगाव 162 1,44,802 52,71,150
जामखेड 48 43,140 16,00022
श्रीरामपूर 115 76,885 31,87,965
कोपरगाव 156 56,349 18,53,913
पारनेर 81 51,270 19,15,004
संगमनेर 211 99,963 29,36,914
श्रीगोंदा 303 1,56,170 46,00,050
नेवासा 132 1,07,458 29,69,161





























































