एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी दरमहा 750 रुपये शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना महामंडळातर्फे 12वीनंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना दरमहा 750 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना होईल. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयीकृत किंवा शेडय़ूल्ड बँकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल. दरवर्षी कामगार अधिकारी शिष्यवृत्तीपात्र पाल्यांची नावे मागवतील. त्यांची छाननी करून लाभार्थी पाल्यांच्या बँक खात्यावर दरमहा सदर रक्कम जमा करण्यात येईल. प्रत्येक एसटी कर्मचाऱयाच्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.