कोरोना काळात एसटीच्या ‘महाकार्गो’ची 56 कोटींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात एसटीला प्रवासी गळतीने प्रचंड आर्थिक फटका बसला; परंतु एसटी महामंडळाने मालवाहतुकीसारखे पर्यायी उत्पन्नाचे साधन वापरून आपले काम सुरूच ठेवले आहे. यासाठी एसटीने ‘महाकार्गे’ नावाने मालवाहतूक सेवेला सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत कमी दर आणि सुरक्षित सेवा यामुळे महाकार्गेने गेल्या वर्षभरात मालवाहतुकीतून 1 कोटी 40 लाख किलोमीटरचा टप्पा पार पाडीत महामंडळाच्या तिजोरीत 56 कोटींचा महसूल जमा केला आहे.

गेल्या वर्षी 21 मे 2020 पासून एसटी महामंडळाने राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. मालवाहतुकीला मिळालेला प्रतिसाद पाहून महामंडळाने ‘महाकार्गे’ या नावाने हा ब्रँड विकसित केला आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रूपात ‘महाकार्गे’ या नावाने रस्त्यावर धावत आहेत. राज्यातील प्रत्येक जिह्यात विभाग नियंत्रकांमार्फत मालवाहतुकीचे नियोजन केले जाते.

100 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट

एसटी महामंडळाने पुढील वर्षभरात मालवाहतुकीतून 100 कोटी रुपयांपर्यंत महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला आहे. विविध शासकीय विभागांमार्फत खासगी मालवाहतूकदारांकडून जी मालवाहतूक करण्यात येते त्यातील 25 टक्के मालवाहतुकीचे काम एसटी महामंडळास देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. मालवाहतुकीसंदर्भात अधिक माहितीसाठी 022-23024068 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.