
एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा आजही कायम राहिला. परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्याशी राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि कायदेशीर सल्लागार ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी चर्चा केली, पण या चर्चेत काहीच निर्णय न झाल्याने पुन्हा भेटण्याचे ठरले. विलीनीकरणाबाबत अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले. शिवाय या संपात राजकीय पोळी भाजा, पण पोळी करपणार नाही याची काळजी घ्या, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू असून आज कर्मचारी परिवहनमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी धडकणार अशी चर्चा होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळी कामगारांच्या प्रतिनिधी मंडळाने परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या बैठकीत प्रामुख्याने विलीनीकरणावर चर्चा झाली. तेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला परिवहनमंत्र्यांनी दिला. त्यावर आपण राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करा, अशी सूचना ऍड. सदावर्ते यांनी केली. परिवहनमंत्र्यांनी त्यास तत्काळ होकार दिला, मात्र तत्पूर्वी कामगारांनी संप मागे घ्यावा असे सांगितले.
सरकार सकारात्मक
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, संपाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. न्यायालयाने या समितीला पूर्ण अधिकार दिले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्दय़ावर ही समिती अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर करील. उच्च न्यायालयाच्या निर्देशात मला फेरफार करता येणार नाही. म्हणून न्यायालयाच्या या समितीचा जो काही अहवाल येईल, त्याच्यावर सरकार सकारात्मक विचार करील असे आपण कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.
त्या वेळेतच काम होईल
कर्मचाऱयांनी संप मागे घ्यावा. लोकांची अडवणूक होत आहे. त्यांना होणारा त्रास कमी करा. विलीनीकरणाची प्रक्रिया दोन-तीन दिवसांत होत नाही. त्यासाठी समितीला योग्य तो वेळ दिला आहे. त्या वेळेतच हे काम होईल असे कामगारांच्या प्रतिनिधींना स्पष्टपणे सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त जर काही तुमचे मुद्दे असतील त्यावर चर्चा करायला तयार आहे, असे आवाहन आपण कामगारांना केल्याचे अनिल परब म्हणाले.
राजकीय रंग नको!
या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा कोणाचाही उद्देश नाही. राजकारण करण्यासाठी नेते भडकवत आहेत. भावना भडकलेल्या असताना कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. राजकीय पोळी भाजा, पण पोळी जळणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन अनिल परब यांनी यावेळी कामगारांना केले.
आंदोलन व हक्कासाठी लढणे हा एसटी कर्मचाऱयांचा अधिकार आहे; पण कोणाच्या तरी भडकवण्यावरून त्यांनी कोणतीही कृती करू नये. उद्या एसटी कर्मचाऱयांचे नुकसान झाले तर हे भडकवणारे नेते कामगारांना विचारायलाही येणार नाहीत. – ऍड. अनिल परब, परिवहन मंत्री































































