
97 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे 2020-21 पर्वाचा उद्घाटन सोहळा येत्या 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता यूट्युबवर आयोजित करण्यात आला आहे.
‘इंटरनॅशनल कमिंग आऊट डे’ ला आयोजित केलेल्या या उद्घाटन सोहळ्याची संकल्पना ‘प्रवास-ओळख अंतर्मनाची’ अशी आहे. हा कार्यक्रम एलजीबीटीक्यू समाजाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर आधारित आहे.
एलजीबीटीक्यू समुदायातील व्यक्तींना समाजाने अजूनही पूर्णतः आपलेसे केलेले नाही. त्यांना समाजात आपली ओळख निर्माण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समाजाचा अविभाज्य भाग असणाऱ्या या समुदायाच्या खडतर प्रवासाबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्रवास-ओळख अंतर्मनाची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर ट्रान्सजेंडर श्रीदेवी लोंढे आहेत.

























































