
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
एमडीएमकचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार वायको यांनी भाषिक वादाला प्रोत्साहन देत चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक खासदार संसदेत हिंदीत बोलत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदी भाषेमुळे संसदेतील भाषणांचा दर्जा खालावल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. हिंदू आणि हिंदू राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी हिंदीतूनच बोलतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
‘संसदेतील भाषणांचा दर्जा आणि संसदेत होणाऱ्या चर्चेचा दर्जा खालावला आहे. याला कारण म्हणजे हिंदी भाषा आहे. अनेक खासदार फक्त हिंदीतून ओरडत असतात. त्यांच्याकडे मांडण्यासारखे कोणतेच मुद्दे नसल्याने ते फक्त आरडाओरडा करून गोंधळ घालतात’, असे वायको म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी हे सर्वोच्च पदावर असूनही हिंदीत संवाद साधतात, ते अयोग्य असल्याचेही ते म्हणाले. देशातील बहुसंख्य नागरिकांना हिंदी भाषा समजत नाही. त्यामुळे सगळ्यांना समजणाऱ्या इंग्रजीतून संवाद साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू संसदेतील प्रत्येक अधिवेशनाला आणि महत्त्वाच्या चर्चांना उपस्थित राहत होते आणि ते इंग्रजीतून संवाद साधत होते, असेही वायको यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई इंग्रजीतून संवाद साधायचे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग हेदेखील इंग्रजीत बोलत होते. फक्त पंतप्रधान मोदीच हिंदीत बोलतात. यामागे हिंदू आणि हिंदू राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्याचा मोदी यांचा प्रयत्न दिसून येतो, असा आरोपही त्यांनी केला. संसदेत जोपर्यंत मान्यताप्राप्त 28 भाषांमध्ये संवाद सुरू होत नाही, तोपर्यंत इंग्रजीतच संवाद साधला पाहिजे असे ते म्हणाले.

























































