
सामना ऑनलाईन । मुंबई
शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी प्रशासनानतर्फे जे कोल्डमिक्स पुरवले जात आहे ते दोन दिवसांत उखडून निघत आहे. त्यामुळे या कोल्डमिक्सचे आयआयटीमार्फत थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. हे मटेरिअल पावसात टिकत नसेल तर त्याचे प्रॉडक्शन बंद करा आणि नवीन तंत्रज्ञान आणा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच मंगळवारपर्यंत कोल्डमिक्सने बुजवलेल्या खड्डय़ांची आकडेवारी प्रशासनाने द्यावी, असेही निर्देश दिले.
खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने आणलेले कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान पूर्णपणे फेल गेले आहे. यावरून स्थायी समितीत नुकतेच सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले होते व हे कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान रद्द करण्याची मागणीही केली होती. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सदस्यांनी वरळी येथील कोल्डमिक्स आणि हॉटमिक्सच्या प्लांटची पाहणी केली. त्या वेळी सदस्यांनी हजारो प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले. मात्र पालिकेचे अधिकारी कोल्डमिक्सच्या तंत्रज्ञानाचे गोडवे गात होते. या पाहणीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, काँग्रेसचे आसीफ झकेरिया, शिवसेनेचे मिलिंद वैद्य, समीक्षा सक्रे, भाजपच्या राजश्री शिरवडकर, अलका केरकर आणि पालिकेचे रस्ते विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
– कोल्डमिक्समध्ये डांबराचे प्रमाण ३.६ इतके आहे. मात्र हे प्रमाण कमी असल्यामुळे ते धरून ठेवत नाही. त्यामुळे ते दोन-तीन दिवसांतच निघतेय, असा मुद्दा सदस्यांनी मांडला. १८ मे रोजी हा प्लांट सुरू झाला, मात्र अद्यापपर्यंत फक्त ३०० टनच कोल्डमिक्स तयार झाले आहे. म्हणजे एका दिवसाला फक्त ५ टन कोल्डमिक्स बनत असेल तर ते प्रमाण फारच अपुरे असल्याचा मुद्दा सदस्यांनी मांडला. या पाहणीच्या वेळी कारखाना सुरू होता, पण तयार कोल्डमिक्सचा साठा मात्र नव्हता. यामुळे सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
पालिका प्रशासनाचा कोल्डमिक्सचाच हट्ट
कोल्डमिक्सला सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी सभागृहात आणि स्थायी समितीत विरोध केलेला असताना पालिका प्रशासनाने मात्र कोल्डमिक्सचाच हट्ट सुरू ठेवला आहे. खड्डे बुजवण्यासाठी विशेषतः पावसात खड्डे बुजवताना कोल्डमिक्सचाच वापर करावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी परिपत्रक काढून अधिकाऱयांना दिले आहेत. कार्यकारी अभियंत्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय हॉटमिक्सचा वापर करू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱयांविरोधात कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
अन्य निर्देश
– पालिकेच्या प्लांटमधून पॅकिंग केलेल्या पिशव्यांमधून आलेले कोल्डमिक्सच वापरावे.
– टेस्टिंगसाठी सँपल देताना ते साईटवरून द्यावेत.
– २५ मि.मी.पेक्षा खोल खड्डा असल्यावरच कोल्डमिक्सचा वापर करावा. रस्ते विभागातील कार्यकारी अभियंते आणि सहाय्यक अभियंत्यांनी आपापल्या वॉर्डातील रस्त्यांची पाहणी करावी.
– प्रोजेक्ट रोडवरील खड्डे कंत्राटदारांनी बुजवावेत.
– हमी कालावधीतील रस्ते संबंधित कंत्राटदारांनीच बुजवावेत. तसे होत नसल्यास संबंधित वॉर्ड अधिकाऱयांनी कारवाई करावी व विभागीय स्तरावर खड्डे बुजवावेत.
– कोल्डमिक्स आणि हॉटमिक्सने किती खड्डे बुजवले त्याचा रेकॉर्ड प्रत्येक वॉर्ड कार्यालयाने ठेवावा.


























































