इस्रायलला पाठिंबा देऊन ‘स्टारबक्स’चं दिवाळं निघालं, अडीच महिन्यात 91 हजार कोटींचं नुकसान झालं

इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या अडीच महिन्यापासून युद्ध सुरू आहे. यात आतापर्यंत हजारो लोकं मारली गेली असून कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचेही नुकसान झाले आहे. या युद्धात फक्त जीवित आणि वित्तहानीच झाली नसून एका अमेरिकन कंपनीचे पार दिवाळे निघाले आहे. युद्धामध्ये इस्रायलला समर्थन दिल्याने अमेरिकन कंपनी स्टारबक्सचे तब्बल 11 बिलियन डॉलरचे (जवळपास 91 हजार कोटी रुपये) नुकसान झाले आहे.

गाझा पट्ट्यात सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एका गटाने इस्रायलची तर दुसऱ्याने पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. याचा थेट परिणाम व्यापारावरही होत आहे. राजकीय तणावही वाढला आहे. अशातच अमेरिकन कंपनी स्टारबक्सने इस्रायलच्या समर्थनाची भूमिका घेतली.

स्टारबक्सने इस्रायलच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे मुस्लिम नागरिकांनी स्टारबक्सला बायकॉट करण्यास सुरुवात केली. याचा फटका स्टारबक्सला बसला असून कंपनीचे बाजारमुल्य 9.4 टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या अडीच महिन्यामध्ये कंपनीला 11 बिलियन डॉलरचा फटका बसला आहे.

दरम्यान, आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्या स्टारबक्सने इजिप्तमध्ये काही कर्मचाऱ्यांनाही नारळ दिला. या कर्मचाऱ्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

स्टारबक्स कॉर्पोरेशन ही एक आंतरराष्ट्रीय कॉपी आणि काफीहाऊसची सीरिज आहे. याचे मुख्यालय वाशिंग्टनमधील सिएटल येथे आहे. या कंपनीचे 50हून अधिक देशांमध्ये 16858 आऊटलेट्स आहेत. यातील सर्वाधिक 11 हजार एकट्या अमेरिकेत असून कॅनडामध्ये 1000 आणि यूकेमध्ये 700 आऊटलेट्स आहेत.