
अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स पंपनीने हिंदुस्थानात सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंकच्या किंमतीची घोषणा अखेर केली आहे. स्टारलिंकची सेवा घेणाऱया यूजर्सला दर महिना 8 हजार 600 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याआधी एक सॅटेलाइट डिश किट घ्यावी लागेल. या किटची किंमत 34 हजार रुपये आहे. त्यामुळे हिंदुस्थानात सॅटेलाईटचे इंटरनेट घेणे हे अन्य इंटरनेट सेवेच्या तुलनेत थोडे महाग असणार आहे. परंतु, या इंटरनेटचे सर्वात खास वैशिष्टय़ म्हणजे यात 220 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. म्हणजेच कोणतीही फाइल अवघ्या काही मिनिटात डाऊनलोड आणि अपलोड होऊ शकते. पंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सला पहिल्या 30 दिवसांच्या ट्रायलची संधी मिळणार आहे. जर यूजर्स या सेवेमुळे समाधानी नसतील तर त्यांनी भरलेले पूर्ण पैसे त्यांना परत मिळतील. स्टारलिंकची सेवा पुढील वर्षी 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
सॅटेलाइटद्वारे मिळणार इंटरनेट
उपग्रहाच्या नेटवर्कमुळे वापरकर्त्यांना हाय-स्पीड, कमी-लेटेंसी इंटरनेट कव्हरेज मिळणार आहे. स्टार लिंकचे इंटरनेट घेणाऱया यूजर्सला एक स्टार लिंक किट मिळेल. यात एक डिश, एक वाय फाय राउटर, पॉवर सप्लाय केबल्स आणि माउंटिंग ट्रायपॉड मिळेल.



























































