राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 75 हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 75 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात दि.22 मार्च ते 3 ऑक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,75,990 गुन्हे नोंद झाले असून 39,039 व्यक्तींना अटक करण्यात आली.96,541 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 66 लाख 18 हजार 532 रु. दंड आकारण्यात आला.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 369 घटना घडल्या. त्यात 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,680 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर96,541 रवाहने जप्त करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 225 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 250 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या