घरकाम करणाऱ्या कामगारांच्या मदतीसाठी 15 कोटी 82 लाख वितरित, सरकारचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडच्या काळात बांधकाम मजुरांना आर्थिक मदत केल्यानंतर महाविकास आघाडीने घरेलू कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. घरकाम करणाऱया कामगारांसाठी 15 कोटी 82 लाख 50 हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात घरकाम करणाऱया कामगारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

राज्यात कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकार विविध उपाय योजना करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यात राज्यातील जनतेला उद्देशून फेसबुक लाईव्हद्वारे भाषण करताना राज्यातील घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली होती.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे सुमारे 1 लाख 5 हजार 500 घरेलू कामगारांची नोंद आहे. या कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ नियम 2010च्या तरतुदीनुसार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी 15 कोटी 82 लाख 50 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. घरेलू कामगारांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल.

बांधकाम मजुरांनाही मदत

राज्य सरकारने बांधकाम मजुरांनाही आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंद असलेल्या 13 लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार आजपर्यंत 11 लाख 10 हजार 929 नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. 30 एप्रिलअखेर 166 कोटी 63 लाख 93 हजार 500 रुपयांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची राज्याच्या कामगार विभागाच्या वतीने देण्यात आली.