
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशाच्या सीमेचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करणाऱया महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. सध्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत दिली जाते. पण शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी आर्थिक मदतीत थेट 75 लाख रुपयांची वाढ करण्याचा हा प्रस्ताव 16 जुलै रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अपंग जवानांना 20 ते 60 लाख रुपये आर्थिक मदत करण्याचीही योजना असल्याचे वृत्त आहे.
युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशातील सर्वच क्षेत्रा अंतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या तसेच सीमा सुरक्षा दलाच्या आणि निम लष्करी जवानांच्या कुटुंबीयांना एक रकमी अनुदान देण्याची योजना राज्याच्या माजी सैनिक कल्याण विभागाने आखली आहे. त्यानुसार लष्करी मोहिमेत वीरगती प्राप्त झाल्यास शहीद जवानांच्या कुटुंबीयांना- वारसांना एक कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार झाल्याचे समजते.
देशाच्या सीमेचे संरक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या शहीद जवानांना आर्थिक मदत देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्याच धर्तीवर राज्यातही प्रस्ताव तयार होत आहे. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या प्रस्तावात महाराष्ट्रातील निम लष्करी जवानांच्या शहीद कुटुंबीयांना व जखमी जवांनाही भरीव आर्थिक मदत देण्याची योजना आहे. पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राचे रहिवाशी असलेले सीआरपीएफमधील दोन जवान शहीद झाले होते. विशेष बाब म्हणून राज्य सरकारने या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत केली होती. आता शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह जखमी जवानांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा प्रस्ताव माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव सुरेश खाडे यांच्या पातळीवर तयार झाल्याचे सांगण्यात येते. माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही कल्पना उचलून धरली. मंगळवार 16 जुलै रोजी हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या प्रस्तावाला अनुकूल असल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली तरी शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यावरच्या तारखेपासून ही वाढीव आर्थिक मदत लागू होईल.
सध्या दिली जाणारी मदत आणि भविष्यातील मदतीचा प्रस्ताव (रक्कम कंसामध्ये)
शहीद जवांनाच्या कुटुंबीयांना दिली जाणारी मदत- 25 लाख रु. (एक कोटी रुपयांचा प्रस्ताव)
अपंगत्व- एक ते 25 टक्के- 5 लाख रु. (20 लाख रु.)
अपंगत्व- 26 ते 50 टक्के- साडे आठ लाख रु. (34 लाख रु.)
अपंगत्व- 51 टक्के ते 100 टक्के- 15 लाख रु. (60 लाख रु.)
जवानाच्या आर्थिक मदतीची सध्याची वार्षिक रक्कम- 8 कोटी 50 लाख 50 हजार रु.
रक्कम वाढवल्यावर भविष्यात होणारा खर्च- 17 कोटी रुपये




























































