एसटीची सीट कोरोनापासून सुरक्षित , अॅण्टी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने बसेस केल्या निर्जंतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे विघ्न लक्षात घेऊन एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची विशेष काळजी घेतली आहे. परिवहन विभागाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बसेस निर्जंतुकीरण करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी सर्व बसेस अॅण्टी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बॅक्टेरियल स्प्रेमुळे सहा महिने याचा प्रभाव टिकून राहणार असल्याने एसटीची सीट कोरोनापासून सुरक्षित होणार आहे. गणेशोत्सवासाठी आतापर्यत रायगड जिल्ह्यातील 1300 बसेसची बुकिंग झाली आहे.

गणेशोत्सव सणावर या वर्षीही कोरोनाची टांगती तलवार असली तरी गणेशभक्त हे आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी परिवहन विभाग सज्ज झाला आहे. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व बसेस या अॅण्टी मायक्रोवेअर कोटीन बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास हा सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. अलिबाग, पेण आगारातील सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाले असून महाड आणि इतर आगारातील बसेसही लवकरच निर्जंतुक केल्या जाणार आहेत.

आणखीन दीडशे बसेस बुकिंग होणार

जिल्ह्यातून 1300 बसेसची बुकिंग झाली असून अजून दिडशे ते दोनशे एसटी बसेसची बुकिंग होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रायगडातून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

महामार्गावर दुरूस्ती पथक तैनात

एसटी बस महामार्गावर काही कारणास्तव बंद पडल्यास त्या त्वरित दुरूस्त व्हाव्यात यासाठी ठिकठिकाणी दुरूस्ती पथके तैनात केली आहेत. रामवाडी, वाकण फाटा, सुखेळी खिंड, लोणारे फाटा, कशेडी घाट याठिकाणी ब्रेक डाउन बस आणि पथक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच रोहा, माणगाव, पेण, महाड येथेही दुरूस्ती पथक तयार ठेवण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आनंददायी व्हावा यासाठीही खबरदारी घेतली आहे. तर परतीच्या प्रवाशासाठी 120 बसेस फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.