देशाला राजकीय स्थैर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाला राजकीयदृष्टय़ा स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. आज शेजारी श्रीलंकेतील लोकशाही संकटात आहे. दुसरा शेजारी पाकिस्तानमध्येही अशीच स्थिती आहे. या आजूबाजूच्या देशांमध्ये स्थिरता राहिलेली नाही. पण खंडप्राय देश, अनेक जाती-जमाती, भाषा, प्रांत असूनसुद्धा देशातील स्थैर्य टिकून राहिले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान. त्यामुळे खऱया अर्थाने देश एकसंध राहिला, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जी दिशा दाखवली त्यातूनच स्वतंत्र हिंदुस्थानच्या प्रगतीला गती मिळाली. आज जेव्हा आपण वीजटंचाईचा प्रश्न पाहतो त्यावेळी बाबासाहेबांनी वीजनिर्मितीला महत्त्व देण्याची आग्रही भूमिका मांडली, तिचे महत्त्व अधिक समजून येते. जलविद्युत निर्मिती आणि सेंट्रल पॉवरग्रीड यासाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. देशात उद्योग-व्यवसाय वाढले पाहिजेत आणि त्यासोबतच कामगारांच्या हक्कांवर गदा येता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली. आज जेव्हा देशभर आपण फिरतो त्यावेळी बाबासाहेबांचे विचार किती खोलवर पोहोचले आहेत याची जाणीव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजात समता, बंधुता आणि न्याय ही तत्त्वे रुजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इंदू मिलच्या जागेवरील स्मारक दोन वर्षांत पूर्ण होईल – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गेल्या दोन वर्षांत केलेले कार्य निश्चितच काwतुकास्पद आहे. विभागाला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही याची काळजी घेतली आहे. मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक येत्या दोन वर्षांत पूर्णत्वास जाईल, असा मला विश्वास वाटतो. तसेच लंडन येथील बाबासाहेबांच्या घराचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.