
सामना ऑनलाईन, मुंबई
बच्चे कंपनीत प्रसिद्ध असणाऱ्या माथेरानच्या मिनीराणीला इंडियन रेल्वे हेरिटेज सोहळय़ानिमित्त उद्या शनिवारी पारदर्शक ‘व्हिस्टाडोम कोच’ आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेचे वाफेचे इंजिन लावून चालविण्यात येणार आहे. माथेरानच्या राणीला जादा पर्यटक लाभावेत म्हणून मध्य रेल्वेने तिचा विकास करण्याची योजना आखली आहे.
माथेरानच्या राणी 1917 सालचे ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेल्या तब्बल 102 वर्षे जुन्या नॅरोगेज 794 बी लोको या वाफेवर चालणारे इंजिनाच्या साथीने उद्या शनिवारी धावणार आहे. यावेळी तिला पारदर्शक ‘व्हिस्टाडोम कोच’ही बसविण्यात येणार आहेत. नॉर्दन फ्रंटीयर रेल्वेत 83 वर्षे सेवा केल्यानंतर हे वाफेचे इंजिन 2001 साली परळच्या वर्कशॉपमध्ये आणण्यात आले होते. हे इंजिन टुरिस्ट स्पेशल ट्रेनसाठी चालविण्यात येणार होते.
कोळशाच्या ठिणग्यांनी वणवा
चाचणीदरम्यान कोळशाच्या ठिणग्यांनी गवत पेटल्याने या वाफेच्या इंजिनाला कोळशावर चालविण्यास वन विभागाने विरोध केला. त्यामुळे 2013 रोजी हे इंजिन तामीळनाडूच्या तिरुचिरापल्लीच्या गोल्डन रॉक रेल्वे वर्कशॉपमध्ये पाठविण्यात आले. येथे या इंजिनाला कोळसा ते डिझेल ऑइल फायर्डमध्ये परावर्तित करण्यात आले. त्यामुळे माथेरानचे जंगल आगीपासून सुरक्षित राहून वाफेच्या इंजिनातून दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे आणि निलगिरी पर्वत रेल्वेतून प्रवास केल्याचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे.
‘व्हिस्टाडोम’चे भाडे ठरलेली नाही
माथेरानचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी ही गाडी खासगी सहलीकरिता आरक्षित करावी यासाठी या मिनीट्रेनला पारदर्शक ‘व्हिस्टाडोम’ कोच बसविण्याची योजना आहे. या गाडीला वातानुकूलित डबाही बसविण्यात आला आहे. एसी डब्याचे भाडे निश्चित झाले असले तरी ‘व्हिस्टाडोम’चे भाडे अद्याप ठरलेले नाही. तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीनंतरच प्रत्यक्षात प्रवाशांसाठी व्हिस्टाडोम कोच सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माथेरानच्या राणीला एसीचा डबा बसविल्यानंतर तिचे डबे घसरण्याची घटना मागे घडली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी घेण्यात येणार आहे.





























































