
जन्म-मृत्यू नोंदणी व दाखल्यांच्या कामाचे विकेंद्रीकरण करून चारही प्रभाग कार्यालयांमार्फत वितरित करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून तांत्रिक पूर्तता होऊनही प्रभाग कार्यालयांकडून जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले देण्याचे काम सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे.
अनेक वर्षांपासून जुन्या मनपा कार्यालयातील जन्म व मृत्यू नोंदणी विभागामार्फत जन्माची व मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दाखल्यांचे वितरणही याच कार्यालयातून केले जाते. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्याने नवीन उपनगरांमध्ये वसाहती वाढत आहेत. जन्म व मृत्यूची नोंदणी व दाखल्यांचे काम एकाच ठिकाणाहून सुरू असल्याने उपनगर परिसरातील नागरिकांना दाखल्यांसाठी जुन्या पालिकेत यावे लागते. नागरिकांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी मनपा आयुक्त जावळे यांनी चारही प्रभाग कार्यालयांमार्फत जन्म व मृत्यूची नोंदणी तसेच दाखल्यांचे वितरण सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. चारही प्रभाग कार्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून त्यांच्यामार्फत हे काम केले जाणार आहे.
सद्यःस्थितीत दाखल्यावर जन्म व मृत्यू नोंदणी उपनिबंधक म्हणून डॉ. बोरगे यांना अधिकार आहेत. मात्र, चारही प्रभाग कार्यालयांमार्फत कामकाज सुरू झाल्यानंतर चारही ठिकाणी स्वतंत्र उपनिबंधक नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. आरोग्य विभागाच्या जन्म व मृत्यू मुख्य निबंधकांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तत्पूर्वी चारही कार्यालयांमधून कामकाज सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. प्रभाग कार्यालयाकडून मात्र याबाबत उदासीनता दाखवली जात आहे. आरोग्य विभागाकडून तांत्रिक पूर्तता होऊनही प्रभाग कार्यालये त्यांच्या स्तरावर जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले देण्याचे काम सुरू करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी जुन्या कार्यालयातच हेलपाटे मारावे लागत आहेत.



























































