वाटद एमआयडीसी विरोधात पोस्ट टाकणाऱ्यांवर तत्पर ‘ॲक्शन’ घेणारे जयगड पोलीस तिहेरी हत्याकांडाबाबत अनभिज्ञ

खंडाळ्यातील दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वीच वाटद एमआयडीसीच्या विरोधकांपैकी काही चाकरमान्यांनी व्हॉटसॲप ग्रुपवर एमआयडीसीच्या विरोधात पोस्ट टाकल्या होत्या. त्यावेळी जयगड पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवून त्या चाकरमान्यांना फोन करून गावी बोलावून घेतले होते. ही तत्परता जयगड पोलिसांनी राकेश जंगमच्या बेपत्ता प्रकरणात दाखवली नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.

दुर्वास पाटीलने त्याची प्रेयसी भक्ती मयेकर हिचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर त्याचे कारनामे बाहेर पडले आहेत.दुर्वास पाटीलने दीड वर्षात तीन हत्या केल्या. त्यामध्ये सीताराम वीर या 55 वर्षीय व्यक्तीला सायली बार मध्ये बेदम माराहाण केली त्या माराहाणीत त्याचा मृत्यू झाला.त्यापाठोपाठ राकेश जंगम याचाही खून केला. राकेश जंगम बेपत्ता असल्याची तक्रार राकेशच्या आईने केली होती. मात्र वर्षभरात जयगड पोलिसांना राकेश जंगमचा शोध लागला नाही. दुर्वास पाटीलने भक्ती मयेकरचा तिसरा खून केला आणि खूनाला वाचा फुटली.रत्नागिरी शहर पोलिसांनी केलेल्या योग्य तपासामुळे तिहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे.

दरम्यान याप्रकरणात जयगड पोलिसांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. राकेश जंगमच्या तपासात जयगड पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही याची गंभीर दखल घेत जयगड पोलीस याप्रकरणात दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.