Share Market News – शेअर बाजार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी उडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market-fall

जागतिक बाजारातून येणारे नकारात्मक संकेत आणि आखातातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी शेअर बाजार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स जवळपास १५०० अंकांनी घसरला आणि निफ्टी ४०० हून अधिक अंकांनी खाली आला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही मोठी घसरण झाली. रुपयानेही विक्रमी नीचांक गाठला. कच्च्या तेलाच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली. आयटी क्षेत्रासाठी हा सर्वात वाईट दिवस होता. आयटी क्षेत्रातील शेअर ३.५०% पेक्षा जास्त घसरणीसह बंद झाले. एनएसईवर, मेटल्स, तेल आणि गॅस, आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक अनुक्रमे १.२६% आणि ०.८१% ने घसरले. बीएसई सेन्सेक्स १४५६ अंकांनी, म्हणजेच १.९२% ने घसरून ७४,५५९ वर बंद झाला. निफ्टी ४३६ अंकांनी, म्हणजेच १.८३% ने घसरून २३,३८० वर बंद झाला. निफ्टी बँक ८८४ अंकांनी घसरला.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांचे आज ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईच्या टॉप ३० स्टॉक्सपैकी फक्त तीन स्टॉक्स वधारले. उर्वरित २७ स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. अदानी पोर्ट्स, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल यांना सर्वाधिक नुकसान झाले. या मोठ्या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसईचे बाजार भांडवल ₹४६७ लाख कोटींवरून ₹४५६ लाख कोटींवर आले.

ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती २.४५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०६.७५ अमेरिकी डॉलरवर पोहोचल्या. वाढत्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक मानल्या जातात. त्यामुळे महागाई वाढू शकते आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.

अमेरिका-इराण संघर्षाबद्दलच्या वाढत्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक संदेश गेला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणसोबतचा शस्त्रसंधी सर्वात कमकुवत आणि “अत्यंत नाजूक” स्थितीत आहे. तज्ज्ञांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहू शकते. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावाच्या चिंतेमुळे रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ३५ पैशांनी घसरून ९५.६३ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.५७ वर उघडला आणि नंतर आणखी ३५ पैशांनी घसरून ९५.६३ वर आला.