दिवसा रिक्षाव्यवसाय रात्री वाहनचोरी, पुण्यात वाहनचोरीचे सात गुन्हे उघड, आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून दिवसभर शहरात रेकी करून रात्री वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने पुण्यातील उंड्री परिसरातून अटक केली. त्याच्याकडून वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आले असून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील हडपसर, लोणीकंद, लोणीकाळभोर, कोंढवा भागातून त्याने साथीदारांच्या मदतीने गाड्या चोरल्याचे समोर आले आहे. अक्षय ऊर्फ भैय्या भिकाजी चव्हाण (रा. गोंधळेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहर परिसरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हद्दीत गस्त वाढवून गुन्हे रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यंकडून सूचना करण्यात आल्या आहेत. यानूसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान वाहनचोरीच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला संशयीत वाहनचोर हा उंड्री चौकात येणार असल्याची माहिती अंमलदार संदीप येळे, राहुल इंगळे यांना मिळाली. यानूसार दरोडा व वाहनचोरी विरोथी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून चव्हाण याला उंड्री चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो दिवसा रिक्षा चालवित असल्याचे समोर आले. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने मिळून शहर परिसरातून वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याच्या इतर साथीदारांना यापुर्वीच पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी चव्हाण याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. तर, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, कोंढवा पोलीस ठाण्यातील सात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने शहर परिसरात साथीदारांच्या मदतीने वाहनचोरी केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दिनकर लोखंडे, विक्रांत सासवडकर, विनायक रामाणे, सुदेश सपकाळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.