
लोकल प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. फक्त गर्दीमुळेच नव्हे तर लोकलवर अज्ञातांकडून होणार्या दगडफेकीमुळेही प्रवासी त्रस्त आहेत. गेल्या सहा वर्षात अशा दगडफेकीच्या घटनेत तब्बल 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा घटनात फक्त 18 टक्के गुन्हे सोडवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. मात्र जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना आता लोकलमधून प्रवास करण्यासही भीती वाटत आहे. अशा गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न श्रीकृष्णने विचारला आहे.
इंग्रजी वृत्तपत्र द टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात मंगळवारी एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. श्रीकृष्ण गवस हा तरुण नवी मुंबईत राहतो. मात्र त्याचे ऑफिस कुर्ला येथे असल्याने तो नेहमी लोकलने प्रवास करायचा. एकदा प्रवास करताना अज्ञाताने त्याच्यावर दगड फेकून मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या प्रसंगातून तो बचावला असला तरी आजही त्याला खाताना आणि बोलतानाही त्रास होतो. या प्रकरणानंतर त्याने नवी मुंबई ते कुर्ला लोकल ऐवजी खासगी वाहन किंवा बसने प्रवास सुरू केला. मात्र हा प्रवास त्याला परवडत नाही आणि अपघाताचा धसका त्याने इतका घेतला आहे की आजही लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी त्याचा पाय धजावत नाही.
श्रीकृष्ण गवसच नाही तर अन्य अनेक प्रवाशांना देखील लोकल प्रवासाची अशी भीती मनात बसली आहे. मुंब्र्याचे रहिवासी मिजनुर अहमद हे सुद्धा लोकल प्रवासात दगड लागून जखमी झाले होते. त्यात त्यांचा एक दात तुटला असून त्यांच्या ओठांना गंभीर दुखापत झाली होती.
2013 ते 19 या काळात सर्वाधिक दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक घटना या ठाणे ते दिवा, दिवा ते कळंबोली आणि ठाणे ते ऐरोली या स्थानकादरम्यान झालेल्या आहेत. सर्व घटनांमध्ये आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
























































