Video -राहुल गांधी यांच्या गाडीवर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक, गाडीची काच फुटली

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची मागची काच फुटल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणी जखमी झाले आहे अथवा नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. केरळमधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असून ही यात्रा पश्चिम बंगालमधील मालदा येथे पोहोचली असताना हा हल्ला झाला.

‘टीव्ही 9 बांग्ला’ने दिलेल्या बातमीनुसार पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. ही दगडफेक करणारे उपद्रवी हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाशी निगडीत असावेत असा दावा केला जात आहे, मात्र याबाबत कोणीही अधिकृतरित्या माहिती दिलेली नाहीये. या दगडफेकीमध्ये राहुल गांधी यांच्या काळ्या रंगाच्या गाडीची पाठची काच फुटली आहे. राहुल गांधी यांचीय भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर हा प्रकार झाला. ही दगडफेक झाली तेव्हा राहुल गांधी हे यात्रेसाठीच्या बसमध्ये होते. मालदा जिल्ह्यातील लक्षा पुलावर ही यात्रा पोहोचली असता ही दगडफेक झाली आहे. राहुल गांधी यांच्या सुर्याव्यवस्थेतील ही एक मोठी चूक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

बिहारमधून बंगालमध्ये ही यात्रा पोहोचली असता ते ध्वजबदल प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेसाठीच्या कार्यक्रमाला सुरक्षाव्यवस्था तुटपुंजी होती असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कार्यक्रम असल्याने पोलीस सुरक्षा प्रामुख्याने ममतांच्या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आली होती. इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पोलिसांनी गाडीची काच फुटण्यामागे गर्दी असल्याचे सांगितले आहे. ही काच दगडफेकीमुळेनाही तर गर्दीच्या रेट्यामुळे फुटल्याचे या पोलिसाने म्हटल्याचे इंडीयन एक्सप्रेसने म्हटले आहे.

बिहारच्या कटीहारपासून सुरू झालेली राहुल गांधी यांची यात्रा बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मालदा येथून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. राहुल गांधी यावेळी या गाडीच्या टपावरून लोकांना हात दाखवत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी 2024 पासून मणिपूर येथून सुरू जाली. 67 दिवसांत ही यात्रा 6713 किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे. 15 राज्ये आणि 110 जिल्ह्यांमधून जाणारी ही यात्रा 20 मार्च रोजी मुंबईत समाप्त होईल.