कवडसे – प्रत्येक भेटीची एक गोष्ट असते

महेंद्र पाटील  << [email protected] >>

कधी कधी काही भेटी सहज होतात असे वाटत असले तरी त्या सहज नसतात. त्या भेटी नियती ठरवते. आपण फक्त निमित्त असतो. काही भेटी अचानक होतात, काही ठरवून होतात, तर काही भेटी ध्यानीमनी नसताना होतात. भेटीतून ओळख होते आणि ओळखीतून पुढे त्या नात्याचा प्रवास सुरू होतो. काही नाती टिकतात, काही क्षणभंगुर असतात, तर काही नाती आजन्म तशीच राहतात. ओळखीची सुरुवात होते जेव्हा विचार जुळू लागतात आणि विचार जुळतात तेव्हा हळूहळू ते नाते घट्ट होत जाते…आयुष्यात नवीन काहीतरी घडू लागल्याचे आपल्याला जाणवू लागते व आपण चालत राहतो एका नव्या वाटेवर, एका नव्या प्रवासाच्या दिशेने आणि प्रत्येक गोष्ट अशी घडत जाते की, जी आपण मनात आधीच ठरवलेली असते. त्या गोष्टीची मनात कल्पना केलेली असते, तर कधीतरी आपण एखादे सुंदर स्वप्न पाहिलेले असते, ते सगळे आपल्याला आता समोर दिसू लागते.

त्या प्रवासात आपल्याला हवीहवीशी वाटणारी वळणे येऊ लागतात आणि आपला प्रवास अजून सुखकर होतो. सगळय़ा गोष्टी अगदी आपल्याला हव्या तशा घडत जातात आणि आपण भान हरपून तो प्रवास करू लागलो. तसेच काहीसे झाले माझे तुझ्या-माझ्या भेटीनंतर. आपण बोलत राहिलो आणि आपल्या मनातील एकेक बंध मोकळे होऊन एकमेकांशी बोलू लागले. आपले शब्द जुळू लागले, विचार जुळू लागले. मी माझ्या मनात ठरवलेले क्षितिज आणि तुझ्या मनातले क्षितिज एकच झाले होते. आपण ज्या वाटेवर जायचे ठरवले होते ती वाट, तो रस्तासुद्धा एकच होता. फक्त आपण अनोळखी होतो. तरीही एकाच वाटेवर प्रवास करत होतो आणि भेट झाल्यावर शब्दांची देवाणघेवाण झाल्यावर समजले की, आपल्याला त्या क्षितिजापर्यंत जायचे आहे. ज्याचा शोध आपण कितीतरी वर्षे मनातल्या मनात घेत होतो ते क्षितिज समोर दिसत होते. पण आपण तिथवर पोहोचू शकत नव्हतो. कारण रस्ता अनोळखी होता, वाटा अनोळख्या होत्या… क्षितिज मात्र ओळखीचे होते.

काही वाटा तुला माहीत होत्या, काही वळणे मला ठाऊक होती आणि आपण जेव्हा बोलू लागलो तेव्हा त्या वाटेवरचा धूसर प्रवास आपल्याला दिसू लागला होता. धुके ओसरले होते आणि आपण सोबत त्या वाटेवर चालत जायचे ठरवून चालू लागलो होतो. आपल्या दोघांच्या भेटीशिवाय हे क्षितिज गाठता येणे शक्य नव्हते. खरे तर आपण दोघांनी एकमेकांचा हातात हात घेऊन या क्षितिजाचा शोध घ्यावा असे नियतीला मान्य होते. हीच तर आपल्या आयुष्याची एक नवी गोष्ट होती. जी आपल्या भेटीनंतर साध्य होणार होती. म्हणून आपल्या भेटीनंतर एका गोष्टीवर माझा खूप विश्वास बसला आणि ती म्हणजे प्रत्येक भेटीची एक गोष्ट असते. ती गोष्ट पूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा त्या व्यक्ती समोर येतात आणि ती भेट होते…