
>> मंगेश मोरे
पावसाचा अंदाज चुकला की, हवामान खात्याच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण या हवामान खात्यावरील कामाच्या ताणाचा अंदाज ना केंद्र सरकारला, ना टीकाकारांना. कमी मनुष्यबळ असूनही मुंबईकरांसह उर्वरित महाराष्ट्रासाठी 24 तास तत्पर राहणाऱ्या मुंबईतील हवामान खात्याला सध्या बंडखोरांच्या गटातील व्हीआयपींच्या ‘भटकंती’ने नसता ताप दिला आहे. व्हीआयपींच्या विमान उड्डाणांदरम्यान बदलत्या वातावरणाचे अपडेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचवताना हवामान तज्ञांची दमछाक होत आहे.
मुंबई विमानतळावर हवामान खात्याचे स्वतंत्र कार्यालय आहे. मुंबईहून दररोज ये-जा करणाऱया तब्बल 1 हजारहून अधिक विमानांना हवामानाचा अॅलर्ट देण्याचे काम या कार्यालयातून केले जात आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे हवामान खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱयांवर कामाचा ताण आहे. तीन शिफ्टमध्ये कामाचे नियोजन करून विमान उड्डाणांना हवामानाचा अलर्ट देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली जात आहे. अशातच बंडखोर गटातील व्हीआयपींच्या ‘भटकंती’मुळे व्हीआयपी उड्डाणाच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
जूनमध्ये ऐन पावसाळ्यात बंडखोरांनी महाराष्ट्रात सत्तासंघर्ष निर्माण केला. त्यांनी महाराष्ट्रातून दुसऱया राज्यांत विमानातून ये-जा करण्याचे तसेच अधूनमधून दिल्लीवारीचे सत्र सुरू केले. यातील व्हीआयपींच्या अतिरिक्त विमान उड्डाणांसाठी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याचा ताण हवामान खात्यावर आला आहे. विशेष म्हणजे, महिना उलटला तरी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. त्यामुळे सत्तासंघर्षाचा पेच सुटेपर्यंत व्हीआयपींच्या उड्डाणांचा आणखी ताप सहन करावा लागण्याची चिंता हवामान खात्यापुढे घोंघावत आहे. या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या भाजप सरकारने ‘पाहुण्या’ व्हीआयपींचा प्रवास कायमचा सुखकर करण्यासाठी हवामान खात्यातील मनुष्यबळ वाढवावे, अशी खाजगीत चर्चा होऊ लागली आहे.
केंद्राकडून धडकते ईमेल्सचे ‘चक्री’वादळ
बिगर भाजपशासित राज्यांत सत्तांतराचा चमत्कार करताना बंडखोरांची पुरेपूर काळजी पेंद्र सरकार घेत आहे. अशा राजकीय नाटय़ांमध्ये विशेष विमानांची व्यवस्था केली जाते, त्यावेळी ती विमाने खराब हवामानामुळे कुठेही भरकटली जाऊ नयेत म्हणून पेंद्र सरकार आपल्या अखत्यारीत असलेल्या हवामान खात्यावर ईमेल्सचा अक्षरशः भडीमार करते. याद्वारे विमान उड्डाणांचे अपडेट मिळवले जातात. एकीकडे पेंद्राच्या ईमेल्सना उत्तर देणे आणि दुसरीकडे व्हीआयपींच्या विमान प्रवासात वेळोवेळी अलर्ट देणे, अशा कात्रीत हवामान खात्याचे अधिकारी अडकतात.
- मुंबई शहरात भारतीय हवामानशास्त्र्ा विभागाच्या (आयएमडी) अंतर्गत कुलाबा वेधशाळा आणि सांताक्रूझच्या हवामान पेंद्राचे कामकाज चालते. या दोन्ही केंद्रांकडून दररोजचे तापमान तसेच वातावरण बदलाबाबत मुंबईकरांना सतर्क केले जाते. विशेषतः पाऊस तसेच चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात हवामान खात्याला जागता पहारा द्यावा लागतो. त्यातच व्हीआयपींच्या विमान उड्डाणांसाठी हवामान बदलाचे क्षणाक्षणाचे अपडेट देण्याची जबाबदारी हवामान शास्त्र्ाज्ञांच्या खांद्यावर आहे. कमी मनुष्यबळामुळे या सर्व जबाबदारींचे नियोजन करताना अधिकाऱ्यांच्या नाकीनाऊ येत आहे.





























































