
नगर जिल्ह्यातील कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामागे असलेल्या बंदिस्त शेळीपालन शेडमधील शेळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 22 शेळ्या ठार झाल्या आहेत. यामध्ये शेळीच्या 9 पिल्लांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात विजय संजय पाटील यांची शेतजमीन आहे. शेतातच त्यांचा जनावरांचा गोठा आहे. जनावरांच्या गोठ्यालगत त्यांनी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. मंगळवारी रात्री वस्तीवरील सर्व कामे आटोपून विजय पाटील घरी आले होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी सहा वाजता ते वस्तीवर गेले. ते वस्तीवर गेल्यानंतर त्यांनी समोरचे दृश्य पाहून आरडाओरडा केला. अंदाजे दहा ते पंधरा भटक्या कुत्र्यांनी कंपाउंडवरून आत जाऊन शेळ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक शेळ्या ठार झाल्या. या हल्ल्यात मृत झालेल्या शेळ्यांमध्ये 9 लहान पिल्लांचा समावेश आहे.
दोन महिन्यांपूर्वीही विजय पाटील यांच्या वस्तीवरील 8 कोंबड्या व 1 शेळी कुत्र्यांनी हल्ला करून ठार केली होती. सदर घटनेची माहिती पाटील यांनी नगरपालिकेला दिली होती. आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
ईश्वरपूर शहरात भटकी कुत्री वाढली आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जवळपास 30 ते 35 भटकी कुत्री फिरत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच येथील महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांची भेट देऊन निषेध केला होता. तरीही नगरपालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही, असे दिसून येत आहे.






























































