
राज्यातील बहुतांश भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असतानाच नगर जिह्यात मात्र सातत्याने पाचशेच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिह्यातील 11 तालुक्यांमधील 61 गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये उद्यापासून 13 ऑक्टोबरपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
नगर जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 च्या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच, जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोनाबाधित असणाऱया गावांमध्ये जिल्हाधिकाऱयांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
कोरोनाची लाट राज्यात ओसरत चाललेली असली तरी नगर जिह्यात दोन-तीन तालुक्यात कोरोना चे पेशंट वाढताना दिसत आहेत. त्यात संगमनेर तालुका आघाडीवर आहे. त्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील 24 गावे लॉक डाऊन करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी काढला आहे. यासह अकोले तालुक्यातील 3 गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. तसेच, जीवनावश्यक वस्तूतील किराणा दुकाने सकाळी 8 ते 11 या वेळेत चालू राहणार आहेत. याचबरोबर जमावबंदीदेखील लागू करण्यात आलेली आहे.































































