
मुंबई शहरातील 73 पुलांपैकी फक्त एक ब्रिज ‘इन गुड कंडिशन’मध्ये असून तब्बल 72 पुलांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे नव्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले आहे. यामध्ये 39 पुलांची मोठी तर 33 पुलांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. नव्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये एकमेव ‘हिंदमाता फ्लायओव्हर ब्रिज’ ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचे समोर आले आहे.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. विशेष म्हणजे मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या डी. डी. देसाई कंपनीने ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल दिल्यानंतरही हिमालय पूल कोसळल्यामुळे तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसर जूनपासून नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये शहरातील 73 पैकी 72 पुलांची दुरुस्ती सुचविण्यात आली आहे.
अशी झाली कार्यवाही
हिमालय ब्रिजसंदर्भात बोगस स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणाऱया डी. डी. देसाई कंपनीला पूल दुर्घटनेला जबाबदार धरून कारवाई करण्यात आली.
त्यानंतर पालिकेने ‘स्ट्रक्टवेल डिझायनर्स ऍण्ड कल्सलटंट प्रा. लि.’कडून शहरातील पुलांचे स्ट्रक्चटर ऑडिट करून घेण्यात आले.
डी. डी. देसाई स्ट्रक्चरल ऑडिटरने मुंबई शहरातील हिमालय ब्रिजसह 17 ब्रिज ‘गुड कंडीशन’मध्ये असल्याचा अहवाल दिला होता, तर नव्या स्ट्रक्चरल ऑडिटरने फक्त एकच पूल गुड कंडिशनमध्ये असल्याचा अहवाल दिला.
दुरुस्तीमुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही
दुरुस्ती सुचविण्यात आलेल्या ब्रिजचे काम करताना या पुलांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुरुस्ती करताना पुलांवरील वाहतूक बंद करावी लागणार नाही. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीमुळे मुंबईकर-प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पुलांची दुरुस्ती तातडीने सुरू करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असे झाले स्ट्रक्चरल ऑडिट
अहवाल आधीचे ऑडिट ‘रीऑडिट’
गुड कंडिशन 17 1
मोठी दुरुस्ती 19 39
किरकोळ दुरुस्ती 43 33
एकूण 79 73


























































