
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई शहरातील 81 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आता लवकरच होणार आहे. पालिकेला निविदा प्रक्रियेत अखेर दुसऱ्या वेळी एक कंत्राटदार मिळाला असून पालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा 38 टक्के वाढीव दराने हे काम केले जाणार आहे. या कामासाठी पालिका 64 लाख 38 हजार 354.12 रुपये खर्च करणार आहे.
14 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल कोसळून सात जणांचा बळी गेला तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले. यामध्ये संबंधित पूल ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल देणाऱ्या ऑडिटर देसाईच्या ‘बोगस’ ऑडिट रिपोर्टमुळेच ही दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर पालिका आयुक्तांनी मुंबईतील सर्वच पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उपनगरातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये 21 पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. मात्र शहरातील पुलांच्या ऑडिटसाठी पालिकेला पहिल्या निविदेत एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नव्हता. तर आता दुसऱ्या वेळी जाहिरात दिल्यानंतर मे. स्ट्रकवेल डिझायनर्स ऍण्ड कन्सलटंस् प्रा. लि.ची एकच निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे या कंपनीकडून शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
… तर अधिक रक्कम देणार
पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करताना गरज भासल्यास ‘ना विध्वंसक चाचणी’ (नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट) करावी लागेल. यासाठी होणारा खर्च कंत्राटदाराला स्वतंत्रपणे देण्यात येईल. या चाचण्या किती व केव्हा करण्यात येतील हे निश्चित नसल्याने हा खर्च देताना वेगळा करार करण्याची पालिकेला गरज भासणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पावसाळ्यासह तीन महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असून स्थापत्य कामासाठी असणाऱ्या अद्ययावत सुधारित अटी लागू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
























































