
प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई शहरातील पुलांची दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुंबई शहर विभागातील 98 पुलांची नियमित तपासणी केली जाणार आहे. यासाठी तज्ञ संस्थेकडून पुलाच्या मजबुतीबाबतच्या 17 पातळ्यांवर तपासणी केली जाणार आहेत. यासाठी पालिका 5 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च करणार असून याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. यामध्ये आता दर सहा महिन्यांनी पुलांच्या मजबुतीची तपासणी करून देखभाल-दुरुस्तीची आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
असे होणार काम
शहर विभागतील पुलांची दृश्य (व्हिज्युअल) तपासणी दर सहा महिन्यांनी म्हणजेच वर्षात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात (पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर) करण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षांचे कंत्राट दिले जाईल.
नियमित तपासणीत पुलांमध्ये काही स्ट्रक्चरल दोष आढळल्यास आणि तीन वर्षांतून एकदा सर्व पुलांचे सखोल व जवळून आणि नॉन डिस्ट्रक्टटिव्ह टेस्ट करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यानुसार कंत्राटदार आवश्यक दुरुस्तीही सुचवणार आहे.
































































