
मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, रुग्णालये, मंडया, वॉर्ड ऑफिस, प्रशासकीय कार्यालये, दवाखान्यांसह सर्वच प्रकारच्या इमारतींचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यासाठी पालिका परवानाप्राप्त तज्ञ स्ट्रक्चरल ऑडिटरची नियुक्ती करणार आहे. जीर्ण इमारती, वास्तू कोसळून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या अनेक इमारती 40 वर्षांपर्यंतच्या असून त्यांच्या मोठय़ा दुरुस्तीची गरज आहे. शिवाय पालिकेला दरवर्षी अनेक इमारतींची छोटी-मोठी दुरुस्ती करावी लागते. पालिकेची प्रशासकीय कार्यालये, दवाखाने आदी ठिकाणी दररोज शेकडोच्या संख्येने मुंबईकर येत असतात. त्यामुळे या वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे तज्ञ संरचनात्मक सल्लागारांची स्वतंत्र पॅनल नियुक्त करून इमारतींची सुरक्षितता तपासणी करण्यात येणार आहे.
असे होणार काम
सल्लागारांमार्फत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती खर्च, पुनर्बांधणी आराखडे, भूकंपरोधक क्षमता, अग्निसुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार आवश्यक दुरुस्ती, डागडुजी करण्यात येणार आहे.

























































