राष्ट्रपतींच्या ताफ्यासाठी अडवली वाहतूक, ट्रॅफिकमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूर दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान त्यांच्या ताफ्याला वाट मोकळी करून देण्यासाठी केलेल्या वाहतूक बदलांमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. वाहतूक बदलांमुळे निर्माण झालेल्या ट्रॅफिकमुळे महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यातच वंदना मिश्रा या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकारामुळे राष्ट्रपती कोविंद हे व्यथित झाले असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हेडकॉन्स्टेबलवर कानपूर पोलिसांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

कानपूर दौऱयावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी कानपूर शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिणामी अनेक ठिकाणी वाहतुकीत बदलदेखील करण्यात आले असून यामुळे शनिवारी गोविंदपुरी पुलावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. या वाहतूककोंडीत सापडल्याने वंदना मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यास देखील उशीर होत होता. या वाहतूककोडींतून आपली सुटका करावी, या मागणीसाठी मिश्रा यांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांकडे वारंवार विनंतीदेखील केली. मात्र ही विनंती मान्य न केल्याने मिश्रा यांना रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला. उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी दिलगिरी व्यक्त केली असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱयाकडून केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी

हा सर्व प्रकार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना समजताच त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची माहिती कानपूर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे. वंदना मिश्रा यांच्या निधनाबद्दल दिलगिरी व्यक्त करताना त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रपती व्यथित झाले आहे. त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱयांना बोलावून या सर्व प्रकारची माहिती घेतली असून आपला शोकसंदेश मिश्रा यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचविण्यास सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानुसार हे दोन्ही अधिकारी मिश्रा यांच्या अंत्यसंस्कारात हजर झाले असून राष्ट्रपतींचा शोकसंदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचविल्याचे त्यांनी सांगितले.