कमी मार्क मिळण्याची धास्ती, सीईटी निकालाआधीच हिंगोलीत विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीईटीच्या परीक्षेत कमी मार्क पडतील, या धास्तीने हिंगोलीत एका विद्यार्थ्याने निकालाअगोदरच गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंगोली शहरातील राज्य राखीव दलाच्या वसाहतीत वास्तव्यास असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांचा मुलगा प्रवीण (22) यंदा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला 72 टक्के गुण मिळाले. सोमवारी सीईटीचा निकाल आहे, हे कळल्यापासून तो भयंकर अस्वस्थ होता.

सीईटीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यास आई-वडिलांना काय वाटेल, या धास्तीपोटी आज निकाल लागण्याअगोदरच त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी घरच्यांनी प्रवीणच्या खोलीचा दरवाजा वाजवला; परंतु प्रतिसाद न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शेजारच्यांना बोलावले. दरवाजा तोडून पाहिले असता प्रवीण पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार संजय मार्वेâ व पुरी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.