
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येतील अशा पद्धतीने आखणी करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. मात्र परीक्षेची तारीख व कशा पद्धतीने घेता येतील यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक 2 सप्टेंबरला सकाळी होईल. त्यानंतर संध्याकाळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक होईल. या बैठकीत परीक्षाबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचे सदस्य आणि सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाइन बैठक झाली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावरजाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये असे उदय सामंत म्हणाले.
31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. ऑक्टोबर महिन्यात यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विद्यापीठे परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर होईल.
जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासास अखेर मंजुरी
जेईई आणि नीटच्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्य़ा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट दाखवून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त पत्रक जारी करीत स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांसाठी जादा तिकीट खिडक्यांची सोयही करण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.




























































