
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
वर्गात ओरडते म्हणून एका विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यापिकेचा फोन नंबर पॉर्नसाईटवर टाकल्याची घटना अहमदाबाद येथे घडली आहे. अश्लील मेसेज आणि फोन आल्यामुळे वैतागलेल्या प्राध्यापिकेने पोलिसात तक्रार केल्यानंतर हे सत्य उघडकीला आलं.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा विद्यार्थी 24 वर्षांचा आहे. त्याला गेल्या काही काळापासून आपल्या प्राध्यापिकेबद्दल अढी निर्माण झाली होती. कारण, त्याच्या शैक्षणिक प्रगतीवरून त्याला ती ओरडत होती. तिच्या ओरडण्याचा सूड म्हणून त्याने तिचं नाव, नंबर, ईमेल आयडी आणि फोटो पॉर्न साईटवर पोस्ट केला. त्यानंतर प्राध्यापिकेला अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. तिच्या फोन आणि ईमेलवर अश्लील मेसेज येऊ लागले. या सगळ्यामुळे त्रासलेल्या प्राध्यापिकेने पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत तपास केला. या पॉर्नसाईट विदेशातून चालवल्या जात होत्या. त्यांच्याशी संपर्क करून या वेबसाईटवर संबंधित माहिती अपलोड करणाऱ्या व्यक्तिचे तपशील पोलिसांनी मागितले. त्यांनी या विद्यार्थ्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
























































