विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणा! शिक्षिकेच्या जन्मदिनी रुग्णांना केले अन्नदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलांच्या बालमनावर खरे संस्कार घडतात ते शालेय जीवनातच. ज्या वर्गशिक्षिकेने शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सुसंस्कार घडवले. जगण्याची, झगडण्याची आणि संघर्ष करण्याची ताकद दिली त्या शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या वर्गशिक्षिका शीतल शेटये यांच्या जयंतीनिमित्त सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमांतर्गत टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरात अडीचशे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि गरीब-गरजूंना अन्नदान करून त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली वाहिली.

सांताक्रुझच्या साने गुरुजी विद्यामंदिरात 30 वर्षे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आयुष्याचे धडे गिरवायला शिकविणाऱ्या शिक्षिका शीतल शेटये यांचे डिसेंबरमध्येच निधन झाले होते. आपल्या आवडत्या वर्गशिक्षिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तावून सुलाखून बाहेर पडलेल्या 1984 सालच्या दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिन वेगळय़ा पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आणि सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमाच्या माध्यमातून अन्नदान आणि फळदानाचे सत्कार्य पार पाडले. विशेष म्हणजे या अन्नदानाच्या निमित्ताने 40 वर्षांपूर्वीचे शालेय मित्र पुन्हा एकदा एकत्र आले आणि त्यांनी आपल्या लाडक्या शेटये बाईंच्या स्मृती जागवल्या. शेटये बाईंच्या या स्मृतिदिनासाठी अन्नमित्रचे सर्वेसर्वा संजय शेटये यांनी पुढाकार घेत सर्व शालेय मित्रांना एकत्रित आणण्याचे कार्य केले.

गेली दोन वर्षे प्रभादेवीचे सौरभ मित्र मंडळ टाटा-केईएम परिसरात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचे सत्कार्य पार पाडत आहेत. सौरभच्या अन्नमित्र उपक्रमाला समाजातील दात्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मंडळाने आपल्या सत्कार्याचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा म्हणून दात्यांचे जन्मदिन, आई-वडिलांचे जन्मदिन, कामात प्रमोशन, जयंत्या तसेच आवडत्या व्यक्तींचे जन्मदिन गरीब-भुकेल्यांना अन्नदान करून साजरे करण्याची अभिनव कल्पना मंडळाने राबविली. ही कल्पना जाहीर होताच समाजातील असंख्य दात्यांनी पुढाकार घेत अन्नमित्रच्या सत्कार्याला भरभरून पाठिंबा दिला. त्यामुळे गेली दोन वर्षे हे सत्कार्य नॉनस्टॉप सुरू आहे.