
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत निर्णय त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा असा सल्ला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी ट्विटरवर एक व्हिडियो शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
‘माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते. तुम्ही या क्षणी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात आहात. तुमची परीक्षा केव्हा, कुठे आणि कशी होईल हे केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या परिवासाठीही महत्वपूर्ण आहे. तुम्ही आमचे भविष्य आहात. एका चांगल्या हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. अशावेळी तुमच्या भविष्याशी निगडीत निर्णय हा तुम्हाला विचारात घेऊनच घ्यायला हवा. सरकार तुमचे म्हणणे ऐकेल, तुमचा आवाज ऐकेल आणि तुमच्या इच्छेनुसार काम करेल अशी मला अपेक्षा आहे. हाच माझा सरकारला सल्ला आहे. जय हिंद…’ असे सोनिया गांधी यांनी या व्हिडियोत म्हटले आहे.
राज्य सरकारांना लागेल ती मदत करू, ‘यूजीसी’च्या उपाध्यक्षांचे आश्वासन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची गोंधळाची परिस्थिती संपली आहे. आता परीक्षा कशा घ्यायचा याचा निर्णय विद्यापीठे घेऊ शकतात आणि त्यासाठी राज्य सरकारांना लागेल ती मदत आम्ही करू असे आश्वासन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. पटवर्धन यांनी हे आश्वासन दिले. ‘परीक्षा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत आणि 30 सप्टेंबरनंतरही परीक्षा होऊ शकतात. राज्य सरकारांकडून त्यासंदर्भात प्रस्ताव येतील तेव्हा न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यावर यूजीसी निर्णय घेईल.’ असे पटवर्धन यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
करायचं तेवढं नुकसान केलं, आता तरी विद्यार्थ्यांशी चर्चा करा! राहुल गांधीं यांची मोदी सरकारवर टीका
तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐका. नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्या सहमतीनंतरच अंतिम निर्णय घ्या, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी’ मोहिमेअंतर्गत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘प्रिय विद्यार्थी, तुम्ही या देशाचे भविष्य आहात आणि तुम्हीच हिंदुस्थानला नव्या उंचीवर नेऊ शकता. कोरोना संकट योग्यप्रकारे हाताळलं नाही असे प्रत्येकाला वाटत आहे. आर्थिक नुकसान झालं. सरकार असमर्थ ठरल्याचे मला स्पष्ट दिसत आहे. सरकारने तुमच्यावर कोणतीही गोष्ट का लादावी? सरकारने तुमचे ऐकले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम सात दिवसांत न काढल्यास तीव्र आंदोलन, ‘विद्यार्थी भारती’ संघटनेचा इशारा
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम सात दिवसांत काढावा अशी मागणी ‘विद्यार्थी भारती’ संघटनेने केली आहे. वटहुकूम न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
‘विद्यार्थी भारती’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी आणि पदाधिकाऱयांनी यासंदर्भात कल्याणचे तहसीलदार यांना पंतप्रधानांच्या नावे पत्र दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी संघटनेच्या वतीने अनेक स्वरुपाची आंदोलने केली गेली. परंतु सरकारकडून त्याला काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असे धुरी यांनी सांगितले.

























































