
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात अभ्यास सहलींचे आयोजन
मुंबईच्या मध्यभागी असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान म्हणजे शेकडो प्रजातींची देशीविदेशी झाडे आणि वनस्पतींनी नटलेली खाण आहे. एकाच छताखाली असलेल्या या देशीविदेशी झाडांच्या पान, फळे-फुलांपासून ते गंध-मुळापर्यंत माहिती आता शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने आयोजित केलेल्या सहलींमुळे मुलांना निसर्गाशी एकरूप होता येणार आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय मुंबईकरांसाठी सहलीचे आवडते ठिकाण आहे. उद्यानातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आणि प्राणिसंग्रहालयातील निरनिराळे प्राणी पाहण्यासाठी शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी उसळते, मात्र या उद्यानात आणि प्राणिसंग्रहालयात विरंगुळय़ाबरोबरच शालेय सहलीमार्फत प्राणी-वनस्पतींबद्दलचे सखोल ज्ञान उपलब्ध होत असते. शहरी भागांत वाढलेल्या मुलांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी या सहली मार्गदर्शक ठरत आहेत.
देशी-विदेशी, दुर्मिळ झाडांची माहिती
देशी-परदेशी प्रजातीची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. आज साऊथ इंडियन इज्युकेशन सोसायटीच्या घाटकोपर आणि माटुंगा येथील दोन शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बागेतील जपानी उद्यानाला भेट दिली. या उद्यानातील विविध रोपांची, झुडपांची, झाडांची माहिती जाणून घेतली. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना उद्यानाविषयी, निरनिराळय़ा फुलझाडांविषयी माहिती दिली.
अभ्यासकही देतात पहिली पसंती
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानविद्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी उद्यानात येतात. वनस्पतीशास्त्राचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी उद्यानात येतात. निसर्गसंपदा आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासता येतात. घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील वंदना यादव (एमएससी, वनस्पतीशास्त्र विभाग), कल्याण येथील बी. के. बिर्ला ऑटोनॉमस महाविद्यालयातील सायली राहतवाल आणि नक्षत्रा शिंदे (पर्यावरणशास्त्र विभाग) या विद्यार्थिनी उद्यानातील झाडांचा अभ्यास करत आहेत, तर अमेरिकेतील अभ्यासक जुलिया कनेको हीदेखील उद्यानात आठ दिवसांसाठी अभ्यास दौऱयावर येऊन गेली.





























































