
>> सुभाष विभुते
‘आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे’, ‘पंख होते तो उड आती रे, रसिया ओ बालमा’सारखी गीतं असोत वा कबिराचा दोहा, राजाभाऊ शिरगुप्पे नावाचा माणूस शांतपणे डोळे मिटून ऐकत असायचा. जणू त्या नादब्रह्मांची त्यांना भूल पडलेली असायची. तीच भावमुद्रा घेऊन राजा शिरगुप्पे नावाचा कलंदर माणूस 31ऑक्टोबर रोजी काळ्या आईच्या कुशीत विसावला.
महाराष्ट्र एका साहित्यिक, विचारवंताला जसा मुकला तसा तो एका भटक्या कलंदर व्यक्तिमत्त्वालाही मुकला. राजाभाऊंचे अवघे आयुष्य वेंगुर्ला, निपाणी, आजरा या तीन गावांत विभागले होते. या तिन्ही ठिकाणचे सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक अनुबंध वेगळे. त्याचा खोल परिणाम या माणसाच्या मनावर होता. त्यामुळे दशावतारी नाटकांपासून डाव्या चळवळीपर्यंत राजाभाऊंचा मुक्त वावर होता. शासन कोणतेही असो, जे बहुजन हिताच्या आड येते त्या साऱयांवर राजाभाऊ शांतपणे शब्द आसूड ओढत. त्यांच्या लेखणीचा प्रभाव एवढा की, विद्रोही साहित्य संमेलनाचे न मागता अध्यक्षपद चालून आले आणि राजाभाऊंच्या प्रतिभेला आणि शब्दाला एक नवा आयाम मिळाला. यातच ‘साधना’ने त्यांना महाराष्ट्र भ्रमंतीला पाठवले. या भ्रमंतीतून त्यांनी ‘महाराष्ट्राची शोधयात्रा’ लिहिली आणि मराठी साहित्याला एक माईलस्टोन पुस्तक मिळाले. अनिल अवचटांच्या नंतर एवढे उत्तम लिखाण मराठीत नव्हते. यानंतर राजाभाऊ ‘साधने’शी जोडले गेले ते शेवटपर्यंत. ते ‘साधने’साठी लिहीत होते. महाराष्ट्राची शोधयात्रा, नंतर ईशान्य भारताची शोधयात्रा आणि बिहारची शोधयात्रा झाली. त्यावर उत्तम पुस्तके लिहिली. त्या तिन्ही पुस्तकांना अफाट यश मिळाले. नाटय़ आणि सिनेमा ही त्यांच्या मर्मबंधातील ठेव होती. कपान, तिच्या पतीचे वैपुंठगमन, निणार्यक क्षणी, तुकाराम, सॉव्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम, होते कुरूप वेडे आदी त्यांच्या नाटय़कृतींनी नाटय़क्षेत्राला नवे आयाम दिले. सामाजिक दंभावर प्रहार केले. त्याचे निपाणी जरी मूळ गाव होते तरी त्याची कर्मभूमी आजरा होती. आजऱयातील धरणग्रस्त चळवळीबरोबरच बहुजनांच्या सर्वच लढाईत ते उतरत असत. नवनाटय़ मंडळ, गंगामाई वाचन मंदिर, पत्रकाराची व डाव्या विचारांची कार्यालये ही त्यांची रमायची ठिकाणे होती. आजऱयातील मुलांसाठी प्रकाशित होणारे मासिक ‘ऋग्वेद’ हे त्यांच्या अंतरीचे स्थान होते. ‘ऋग्वेद’साठीच त्यांनी ‘न पेटलेले दिवे’ ही उपेक्षित बाल्यावरील लेखमाला लिहिली आणि तीच ‘साधना’त पण प्रकाशित झाली. शिक्षणक्षेत्रातील विचारवंतांचे लक्ष या पुस्तकाकडे गेले. त्यावर अनेक विचार संवाद झाले. मासिक ‘ऋग्वेद’च्या कार्यालयात बसून अल्पमूल्य प्रकाशन योजनेसाठी त्यांनी ‘एक होता पक्षीसखा प्राणिमित्र’ हे पुस्तक लिहिले आणि राजाभाऊंची ओळख बालसाहित्यिक म्हणून निर्माण झाली. ‘ऋग्वेद’च्या व्यवस्थापिका पुष्पलता घोळसे त्यांच्या मानसकन्या बनल्या आणि या बापलेकीच्या नात्यातून बेनहूर, बसराची ग्रंथपाल, गांधी नावाचा शूर माणूस, चिक्याच्या गोष्टी आदी पुस्तके, लेखमाला मुलांसाठी लिहिल्या गेल्या. इथेच ‘आदिमायेच्या पारंब्या’ व ‘प्रॉमिथिसच्या कविता’ उतरल्या. हे सारे करत असताना राजाभाऊ कधी एके ठिकाणी विसावले नव्हतेच. त्यांचे भटकेपण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते आणि यातूनच महात्मा बसवेश्वर, शरण चळवळ यांचा शोध चालू झाला. महाराष्ट्र कर्नाटकातील शरण चळवळ राजाभाऊंमुळे फोफावली आणि वैचारिकदृष्टय़ा समृद्ध झाली. या व्यासंगातून त्यांनी बसवेश्वर यांच्यावरील शोध ग्रंथ लिहिला. त्यांच्या पत्नी मीनाताई यांनी साथ दिली. राजाभाऊंचा अथक कामाबरोबर बेदरकारपणा होताच. मधुमेहासारख्या विकाराला हेच पुरेसे झाले. प्रकृती साथ देत नसतानाही निबीड अरण्यातील गुहेजवळ बसवेश्वरच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर काळाने घाला घातला. असंख्य क्षेत्रांत वावरणारा हा मुसाफिर अनंताच्या प्रवासाला एकटाच निघून गेला.

























































