
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. साईमंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी टुरीझम पोलीस आऊट पोस्ट उभारण्यात येणार असून त्याचा शुभारंभ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी केला जाईल, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिली. पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.
दर्शनानंतर त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्याला जात नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे आदी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत शिर्डी तिर्थक्षेत्राचा आढावा घेतला.
पत्रकारांशी बोलताना जयस्वाल यांनी सांगितले की, साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने विविध राज्यातून भाविक येतात. भाविकांच्या सुरक्षितेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. मंदिर प्रशासनासोबत चर्चा करुन मंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी टुरीझम आऊट पोस्ट उभारणार असून त्याचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी केला जाईल. चौकी उभारण्याची जबाबदारी नाशिक परीक्षेत्राचे विशेष महासंचालक दिघावकर, जिल्हा पोलीस प्रमुख पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सातव, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घेतली असून तशी ग्वाही दिल्याचे सांगितले. या ठिकाणी विविध राज्याची भाषा उवगत असणारे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची नेमणुक केली जाईल.
भाविकांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊन नये यासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाईल. मंदिर परीसरात होणाऱ्या मोबाईल चोरीसह विविध गुन्ह्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिर्डी पोलीस ठाण्याला मनुष्यबळाची कमतरता असल्याने लवकरच यात वाढ केली जाईल. तसेच ऐनवेळी गरज भासल्यास तातडीने फौजफाटा उपलब्ध केला जाईल. शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या प्रकरणाची यापुढे विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
दिप्ती सोनी प्रकरणाचा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपास करुन या महिलेला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. याबाबत उच्च न्यायालयाने काही सूचना केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना महिला मिसींगच्या घटनांबाबत विशेष लक्ष देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना निर्देशांचे पालन
साईसंस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. दर्शन रांगेत प्रवेश करताना भाविकांचे तापमान, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, दर्शन रांगेत सहा फुटांवर चौकोन, दर्शन रांगेत पाय धुण्यासाठी पाणी व्यवस्था, 22 ठिकाणी स्वयंचलित सॅनिटायझर मशिन या उपाय योजना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या आहेत. यापुर्वी दर्शन रांगेत केवळ मंदिरात साईबाबांचे दर्शन घेता येत होते आता मात्र एकाच वेळी रांगेतून द्वारकामाई,समाधी मंदिर, गुरुस्थान, दत्तमंदिर, नंदादिप आदीचे दर्शन केवळ 10 ते 15 मिनीटात होते. अतिशय चांगली सुविधा भाविकांना संस्थानने उपलब्ध करुन दिली आहे. संस्थान प्रशासनाच्या या उपाययोजनांचे कौतुक जयस्वाल यांनी केले. साईमंदिरात दर्शनासाठी आलो असता भक्तीमय वातावऱणाची अनुभुती आली. अतिशय चांगले दर्शन झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.



























































