छावण्यांच्या अनुदानासाठी सरकारकडे प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

चारा छावणी चालकांच्या अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे 20 कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजुर होऊन निधी प्राप्त होताच छावणी चालकांना 30 मार्चपर्यंतच्या अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, सरकारकडून अद्याप छावणी चालकांना अनुदान प्राप्त झालेले नाही. अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नसल्यामुळे चारा छावण्यांत असणार्‍या जनावरांना दररोज लागणार्‍या चार्‍यासाठीचा खर्च भागवताना छावणीचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अनुदानाची रक्कम मिळावी, यासाठी छावणी चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अखेर जिल्हा प्रशासनाने देखील चारा छावणी चालकांच्या अनुदानापोटी 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.

30 मार्चपर्यंतच्या अनुदानाचा हा प्रस्ताव असल्यामुळे मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी 70 रुपये व लहान जनावरांसाठी प्रत्येकी 35 रुपये याप्रमाणे अनुदानाची रक्कम मागण्यात आली आहे. ही रक्कम प्राप्त होताच चारा छावणी चालकांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 ते 30 एप्रिल याकाळातील अनुदानासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव सादर करताना मात्र मोठ्या जनावरासाठी प्रत्येकी 90 रुपये व लहान जनावरासाठी प्रत्येकी 45 रुपये याप्रमाणे अनुदान मागितले जाणार आहे. सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हे अनुदान प्राप्त होईल.

489 चारा छावण्यांना मंजुरी

जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असताना त्यासोबत चारा व पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 489 चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी 460 चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये 38 हजार 981 लहान व 2 लाख 46 हजार 234 मोठी, अशी एकूण 2 लाख 85 हजार 215 जनावरे दाखल आहेत. मे महिन्यापर्यंत चारा छावण्यांची संख्या ही पाचशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.